विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्राचा ८.६० कोटींचा निधी मंजूर

खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणेंचा यशस्वी पाठपुरावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून दुरुस्ती व पुनर्संचयनासाठी ८ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. समुद्राच्या सततच्या लाटांचा थेट मारा सहन करणाऱ्या विजयदुर्ग किल्ल्यातील दर्या बुरुजाची तटबंदी कमकुवत झाली होती. नैसर्गिक झिजेमुळे भिंतींच्या खालच्या भागात पोकळी निर्माण होऊन किल्ल्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. हा धोका लक्षात घेता किल्ल्याच्या जतनासाठी आता तांत्रिक व शास्त्रीय पद्धतीने पुनर्संचयनाचे काम हाती घेतले जाणार आहे. या निधीसाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच खासदार नारायण राणे यांनीही केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित केले होते.

या प्रयत्नांना यश मिळत पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंग रावत यांनी निधीला अधिकृत मंजुरी दिली आहे. सदर काम मुंबई व विजयदुर्ग उपमंडळामार्फत राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारा विजयदुर्ग किल्ला नव्या रूपात उभा राहणार असून, पर्यटनवृद्धीलाही मोठी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!