राणे कुटुंब येणार एकत्र; नारायण राणेंच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
कणकवली (प्रतिनिधी) : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांनंतर माजी केंद्रीयमंत्री व खासदार नारायण राणे हे उद्या, ४ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर बांदा ते कणकवली दरम्यान भव्य शक्तीप्रदर्शन व जंगी स्वागत आयोजित करण्यात आले आहे. कणकवलीत होणाऱ्या सभेत नारायण राणे नेमकी काय भूमिका मांडणार, काय संदेश देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे वेगवेगळ्या पक्षांत कार्यरत असलेले राणेंचे हितचिंतक मोठ्या संख्येने या स्वागतासाठी एकवटले असून, “सिंधुदुर्ग हा नारायण राणेंचाच” हे दाखवून देण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या दोन दिवसांत मालवण व कुडाळ येथे राणे समर्थकांच्या बैठका पार पडल्या. उद्याच्या रॅलीमध्ये खासदार नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचेही भव्य स्वागत करण्यात येणार आहे. बांदा येथे स्वागत झाल्यानंतर कणकवलीपर्यंत विविध ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत होणार असून, त्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या तीन नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकांत राणे फॅक्टर निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले. सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपालिका भाजपने पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या, तर मालवण नगरपरिषद आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सहज जिंकली. कणकवली नगरपंचायतीच्या अटीतटीच्या लढतीतही निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीने विजय मिळवला. खासदार नारायण राणे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत नसतानाही जिल्ह्यात राणेंचाच करिष्मा कायम असल्याचे या निकालांनी अधोरेखित केले.
राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार पाहिलेल्या नारायण राणेंनी शिवसेना, काँग्रेसनंतर भाजपमध्ये प्रवेश करून स्वकर्तृत्वावर केंद्रात मंत्रीपद मिळवले. मात्र, यंदाच्या पालिका निवडणुकांत त्यांना बाजूला ठेवण्यात आल्याची भावना समर्थकांत आहे. राणेंची तीव्र इच्छा असतानाही सिंधुदुर्गात महायुती न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेजारच्या रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत महायुती झाली असताना, सिंधुदुर्गात मात्र तसे घडले नाही.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांतही महायुतीऐवजी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू झाल्याने राणे समर्थकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे एकत्र काम केलेल्या कार्यकर्त्यांना परस्परविरोधी लढतींचा सामना करावा लागणार असल्याची भावना तीव्र होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध पक्षांतील राणे समर्थक पुन्हा एकदा खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली एकवटले असून, उद्याच्या भव्य शक्तीप्रदर्शनातून त्याची ठोस प्रचिती दिली जाणार आहे.












