सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : आपल्या ताब्यातील सुमो गाडीतून अवैध गुटखा वाहतूक करताना पकडलेला आरोपी दिनेश अर्जुन गावडे याचा जामीन अर्ज प्रधान सत्र व जिल्हा न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी नामंजूर केला. आरोपी दिनेश गावडे याला त्याच्या ताब्यातील सुमो गाडीतून बांदा ते चौके अशी गुटखा वाहतूक करताना इन्सुली पोलीस चेक पोस्टच्या अलीकडे 18 डिसेंबर 2025 रोजी पकडण्यात आले होते. सदर गुटखा दिनेश गावडे याने भूषण उर्फ आबा शिरसाट याच्याकडून शिरसाट याच्या तोरसे गोवा येथील गोडाऊन मधून खरेदी केला होता. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी दिनेश गावडे याने जिल्हा न्यायालयात सादर केलेल्या अर्जाला सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेतली.आरोपी दिनेश गावडे याला अटकपूर्व मेडिकल चेकअप करताना त्याचा बीपी वाढल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याला अटक करता आली नव्हती. दिनेश गावडे याने पकडलेला गुटखा दुसरा आरोपी आबा शिरसाट याच्याकडून तोरसे येथील गोदाऊनमधून खरेदी केल्याचे सांगितले आहे. या गोडाऊन मध्ये आणखी गुटखा साठा आहे अगर कसे याची तपासणी करायची आहे, सदर गुटखा दिनेश गावडे कोठे नेणार होता, कोणाला विक्री करणार होता याचा तपास करणे, गावडे आणि शिरसाट या दोन्ही आरोपींत केव्हापासून अवैध गुटखा खरेदी विक्री व्यवहार सुरू आहे याचा तपास करणे, या गुन्ह्यात गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील अन्य साथीदार आहेत काय याचा तपास करणे, दिनेश गावडे याला वैयक्तिक बॉण्डवर सोडण्यात आले होते, दरम्यान त्याने या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीसाना सहकार्य केलेले नाही, सदर गुन्हा गंभीर असून तपासकामी आरोपीची आवश्यकता आहे आदी मुद्दे न्यायाधीशांसमोर मांडून आरोपी गावडेचा जामीन मंजूर करू नये असा युक्तिवाद सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रधान सत्र व जिल्हा न्यायाधीश श्री. देशपांडे यांनी आरोळी दिनेश गावडेचा जामीन अर्ज फेटाळला?












