सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : स्वतःच्या आईचा कोयत्याने वार करून अमानुष खून केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी रवींद्र रामचंद्र सोरप ( रा.वारगाव ) याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र व प्रधान न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी नामंजूर केला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला. दारूचे व्यसन असलेल्या रवींद्र सोरप याने 10 सप्टेंबर 2025 रोजी रात्री साडे अकरा वाजता स्वतःच्या आईचा कोयत्याने वार करून राहत्या घरात खून केला होता. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी रविंद सोरप याच्या जामीन अर्जाला सरकारी वकील देसाई यांनी हरकत घेतली. आरोपी रवींद्र याने गुन्हा केल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला होता. तपासकामी तो न्यायालयात हजर राहण्याची शक्यता कमी आहे, गुन्ह्यातील साक्षीदार हे आरोपीचे नातेवाईक असून एकाच घरात राहतात, जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकेल, खून केल्यानंतर आरोपी हा भाऊ भिकू याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला होता त्यामुळे तो पुन्हा तसा गुन्हा करू शकतो, स्वतःच्या आईचा खून करणाऱ्या आरोपी रवींद्र बद्दल जनतेत प्रचंड असंतोष असून आरोपीला जामीन मिळाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आदी मुद्दे मांडून आरोपी रवींद्र याच्या जामीन अर्जाला सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेतली. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र व प्रधान न्यायाधीश श्री. सुधीर देशपांडे यांनी आरोपी रवींद्र सोरप चा जामीन अर्ज फेटाळला.












