सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेले ७ दिवसापासून सुरु असलेले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे बेमुदत साखळी आंदोलन ३० जानेवारी पर्यंत तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यातआला आहे. प्रशासनाकडून काही मागण्या मान्य केल्याने व उर्वरित मागण्या बाबत टप्या-टप्याने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन थांबविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाचे अनेकवेळा लक्ष वेधूनही शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या प्रशासनाकडून पूर्ण होत नसल्याने प्राथमिक शिक्षक समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. जिल्हा परिषद कार्यालयासमोर ७ जानेवारी पासून बेमुदत आंदोलन सुरु केले होते. लोक प्रतिनिधी काका कुडाळकर यांनी आंदोलन स्थळी भेट देत त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाशी चर्चा घडऊन आणली. या चर्चेत प्रशासनाकडून काही प्रमुख मागण्या बाबत तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे सांगितल्याने गेले ७ दिवस सुरु असलेले आंदोलन तुर्तास स्थगित केले असल्याची माहिती शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी दिली.











