वैभववाडी तालुक्यातील भाजप इच्छुक उमेदवारांच्या पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून मुलाखती

उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती मतदार संघातील भाजपाकडून निवडणूक लढवण्यास  इच्छुक असलेल्या उमेदवारांची पालकमंत्री नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी भाजपा कार्यालयात मुलाखती घेतल्या आहेत. सोमवारी उमेदवारांची पाहिली यादी भाजपकडून प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
    
वैभववाडी येथील भाजपा कार्यालयात इच्छुक उमेदवारांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मुलाखतीच्या अगोदर पालकमंत्री नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष देईल त्या उमेदवारांसाठी सर्वांनी पक्षासाठी काम करावे. वैभववाडी तालुक्यात भाजपाला कोणीही स्पर्धेक नाही. तुम्ही सर्वजण तुमच्या तुमच्या  गावात वाडीत, विभागात जनाधार असलेले कार्यकर्ते आहात. याची आम्हाला जाणीव आहे. मात्र मोजक्या जागा असल्यामुळे सर्वांना संधी देता येणार नाही. ज्यांना संधी मिळणार नाही. त्यांनी नाराज होऊ नये. आपल्याला सुद्धा भविष्यात संधी देण्यात येईल. आगामी निवडणुकीत भाजपाची एक हाती सत्ता येणार आहे.यासाठी एकदिलाने सर्वांनी कामाला सुरुवात करा. असे आवाहन पालकमंत्री राणे यांनी केले.

कोळपे जिल्हा परिषद मतदार व त्या मतदार संघातील भुईबावडा पंचायत समिती व कोळपे पंचायत समिती मतदार संघातील इच्छुक प्रथम मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. कोळपे जिल्हा परिषद मतदार संघ  सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्यामुळे या मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. या मतदारसंघात दिग्गज उमेदवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

त्यानंतर कोकिसरे जिल्हा परिषदेतील इच्छुक उमेदवार व उंबर्डे, कोकीसरे पंचायत समितीतील इच्छुक उमेदवारांची पालकमंत्र्यांनी मुलाखती घेतल्या.
त्याचप्रमाणे लोरी जिल्हा परिषद व लोरे पंचायत समिती तसेच खांबाळे पंचायत समिती मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत अशा ठिकाणी संबंधित इच्छुक उमेदवारांनी एकत्र बसून आपल्यातून एक नाव निश्चित करावे. असे सूचित केले आहे.

कोळपे जिल्हा परिषद व खांबाळे पंचायत समिती मतदार संघात सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे या प्रभागातील उमेदवार निश्चित करताना पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरणार आहे. या दोन्ही मतदारसंघात तालुक्यातील दिग्गज उमेदवारांनी उमेदवारी मागितले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नेमकी कोणाची वर्णी लावतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!