कट्टा मित्र मंडळ व फोंडाघाट ग्रामस्थांकडून डॉ.आपटे यांचा यथोचित सत्कार !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट पंचक्रोशीतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील,आरोग्य स्वातंत्र्यासाठी गेली पन्नास वर्षे अथक सेवा देणारे,डॉ.सुरेश आपटे यांना जिल्ह्याच्या डॉक्टर फॅटर्निटी क्लबचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रजासत्ताक दिनी एका वैद्यकीय सेवाधर्मीचा असा सत्कार करण्याचा योग फोंडावासीयांना आला, ही आनंददायी गोष्ट आहे.आम्हाला आरोग्य शिक्षण आणि प्रेरणा देणाऱ्या डॉ. आपटे यांना दीर्घायुरोग्य चिंततो.अशा शब्दात ज्येष्ठ कवी व झिंनझिंनाटकार डॉ. महेश केळुसकर यांनी डॉक्टर आपटे यांना गुलाबपुष्प, शाल आणि स्वलिखित “माझ्या मराठीचा टिळा” हे स्वलिखित पुस्तक देऊन गौरव केला.

कट्टा मित्र मंडळ, फोंडाघाट यांचे कडून आपटे यांचा जीवनगौरव मिळाल्याबद्दल, त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी सरपंच सौ. संजना आग्रे यांनी सर्वांच्या वतीने, त्यांना श्रीफळ- शाल- पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रास्ताविकामध्ये सुंदर पारकर यांनी डॉ. आपटे यांच्या वैद्यकीय प्रवासाला गवसणी घातली. तर अबू पटेल, राजू पटेल, शामल म्हाडगुत,सरपंच सौ. संजना आग्रे यांनी डॉक्टरांच्या विविध पैलू उलघडणाऱ्या आठवणींना उजाळा दिला. सेवेतील संघर्ष, रुग्णाला मानसिक समाधान देण्याची वृत्ती,आपला डॉक्टर ही रुग्णांच्या मनामधील मानसिकता, कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर म्हणून तत्परता, रुग्णांना लवकर बरे वाटावे म्हणून त्यांची धडपड, मायेने विचारपूस, बिलासाठी अडवणूक न करता प्रसंगी शिस्तीचे वागणे इत्यादी पैलू वर त्यांनी प्रकाश टाकला. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये, अमुलाग्र बदल होत असताना, सध्या डॉक्टर यांची रुग्णसेवा मार्गदर्शक असल्याचे कुमार नाडकर्णी यांनी सांगितले.
डॉ. सुरेश आपटे यांनी फोंडावासीयांच्या ऋणात राहावयास आवडेल असे सांगून,आपला हा सत्कार कुटुंबीयांना आणि रुग्णांना समर्पित केला. समारोप संतोष टक्के यांनी आभार प्रदर्शनाने केला. फटाक्यांच्या आतषबाजी संपन्न झालेला या सोहळ्याला डॉ.शैलेंद्र आपटे, डॉ महेश केळुसकर, कवी शशिकांत तिरोडकर ,पुढारीचे गणेश जेठे, मंडळाचे अध्यक्ष सुरेश टक्के, व्यापारी संघटनेचे यशवंत मसुरकर,जि. प. उमेदवार अनंत पिळणकर, चैतन्य सावंत अनिल पटेल, समीर मांगले,राजन नानचे, अबू पटेल, महिलावर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











