खाकी वर्दीत माणूस नाही, एक कर्तव्य उभा असत

समाजासाठी जगणं हेच, पोलिसांचे जीवन असतं – पोलिस निरिक्षक मनोज सोनवलकर

पोलिस उपनिरीक्षक झूजे फर्नांडिस तथा बाबू यांचा मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून आनंददायी सत्कार

फोंडाघाट (प्रतिनिधी) : एस आर पी पासून सुरु झालेला प्रवास आज पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचला आहे. स्वाभिमानी मितभाषी तरीही शिस्तप्रिय पोलिस उपनिरीक्षक झुजे फर्नांडिस यांनी पोलीस खात्यातील अनेकविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पेलल्या आहेत. अनेक वेळा त्यांचे मार्गदर्शन आणि स्पष्टवक्तेपणा मोलाचा ठरल्याने, अनेक गुन्ह्याच्या तपासात त्याचा उपयोग झाला आहे. “न हरता, न थकता, न थांबता करणारा प्रयत्न म्हणजे पोलीस ! याची प्रचिती अर्थात झुजे होय” अशा शब्दात वैभववाडीचे पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी झुजे फर्नांडिस यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

फोंडाघाट ग्रामस्थ, आप्तेष्ट आणि मित्र परिवारातर्फे पोलिस उपनिरीक्षक झुजे फर्नांडिस यांच्या प्रशासकीय सेवेतील यशस्वी कामाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर फर्नांडिस यांची पत्नी आणि परिवार उपस्थित होता. सोहळ्याची सुरुवात भगवान येशूच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर सुंदर पारकर, राजू पटेल, पोलीस उपनिरीक्षक फोंडेकर, ढोलम, दिनेश नारकर, उपनेते संजय आग्रे, प्रशिक्षक विनोदसिंह पोपळे, अँथोनी पिंटो इत्यादी मान्यवरांनी झुजे (बाबू) यांच्या सानिध्यातील त्याच्या आठवणींना उजाळा देताना त्याचा स्पष्टवक्तेपणा आणि आपुलकीच्या स्वभावाचा गौरव केला. शालेय जीवनापासून आजपर्यंत त्याच्या मुश्किल, मायेच्या आणि वर्गमित्रांचा ग्रुप तयार करण्यापासून यशस्वी स्नेहसोहळा दरवर्षी साकार करण्यात याची भूमिका याचे सर्वांनी कौतुक केले अन् आपले मन मोकळे केले. सर्वांनी भेटवस्तु देऊन ‘बाबू पोलीस मॅन वर्ग मित्राचा’ यथोचित सत्कार केला.

या सत्काराला उत्तर देताना झुजे यांनी भावनाविवश होत आपल्या पोलीस प्रशासकीय सेवेची माहिती दिली आणि सांगितले “आई घरी वाट पाहते, मुलं बाबांची आठवण काढतात, पण माझी ड्युटी पहिली आहे हे सगळं ते समजावून घेतात. आजपर्यंतच्या गरिबीच्या तरीही संघर्षमय परिस्थितीत विनाडाग पोलीस ही बिरुदावली आज सौख्य देत आहे. त्यामुळे आजच्या यशस्वीतेचे श्रेय माझ्या मोठ्या भावाला, पत्नीला आणि मला सांभाळून घेणाऱ्या परिवारासह वर्गमित्र, प्रशिक्षक, बुजुर्ग यांना आहे. या सोहळ्याचे सूत्र संचालन सायली पवार यांनी तर आभार प्रदर्शन संतोष टक्के व कुमार नाडकर्णी यांनी केले.

error: Content is protected !!