त्यांना तुकोबाराय कोणी शिकवले नाहीत म्हणून!

……
काल एका व्याख्यानाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात गेलो होतो. अर्थातच लालपरी एसटीने. वाटेत कुठल्याशा स्टाॅपवर एक आजोबा चढले. अंगात धोतरसदरा, डोक्यावर सफेद टोपी. आजोबांना माझ्या शेजारीच जागा मिळाली. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर आजोबांनी माझी चौकशी केली. कुठे जाताय, काय करता वगैरे विचारलं. मला खूप बरं वाटलं, कारण अलिकडे बसच्या प्रवासात पूर्वीसारखं कोणी शेजरच्याशी ओळखदेख करून घेत नाही. जो तो आपल्या मोबाईलमध्ये लक्ष खुपसून असतो.

बोलण्याच्या ओघात आजोबा म्हणाले, ‘निवडणूका सुरू आहेत. जो तो पैशे वाटतोय. आणि लोकं बी घेत्यात. माझं वय आता सत्तर आणि पाच. इतक्या निवडणूका आयुष्यात बघितल्या, पण आताच्यासारखं पूर्वी कधी पाह्यलं न्हाई.’

‘आजोबा, तुमच्या पिढीने आम्हाला तुकोबाराय शिकवले नाहीत, त्याचा हा परिणाम आहे,’ मी म्हणालो.
आजोबांना माझं उत्तर अनपेक्षित होतं. मी काय म्हणतोय ते त्यांच्या लक्षात आलं नाही.

‘आजोबा, समजा आज तुकोबाराय असते आणि एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता त्यांना मतासाठी पैसे द्यायला गेला असता तर तुकोबांनी काय केले असते?’ मी विचारले.

‘हाकलून लावले असते! तुकोबारायांना खुद्द छ. शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता, तो त्यांनी घेतला नाही, परत पाठवला. महाराजांनी आदर म्हणून पाठवलेला नजराणा त्यांनी घेतला नाही. तुकोबांची परिस्थिती अडचणीची असताना देखील त्यांनी तो घेतला नाही. शिवाजी महाराज बदल्यात काही मागणार होते काय? नाही. तरीही त्यांनी तो परत पाठवला. जे आपले नाही ते घ्यायचे नाही. एवढेच नव्हे तर जिथे कीर्तन करावे, तिथे अन्न न सेवावे, हा त्यांचा नेम होता,’ आजोबा म्हणाले.

‘तेच तर म्हणतोय मी. जगात माणसाने कसे जगावे हे संत सांगत असतात आणि त्याचा आदर्श स्वतःच्या वागणुकीतून समाजासमोर ठेवत असतात,’ मी म्हणालो.

‘खरं हाय. पैसे देणारे अधर्म करतातच, पण पैसे घेऊन मत देणारेही पाप करतात. अधर्म करतात. ते त्यांना कळत नाही. याचे फळ त्यांना भोगावे लागणार याच्यावर विश्वास नाही त्यांचा. आताची पोरं शाळेत शिकतात. मोठमोठ्या काॅलेजात शिकतात. त्यांनी मोठं व्हावं म्हणून आम्ही त्यांना शाळाकाॅलेजात घातलं. पण ज्ञानोबा, तुकोबा शिकवायचं राहून गेलं हे मात्र खरं!’ आजोबा म्हणाले.
……..

error: Content is protected !!