खारेपाटण (प्रतिनिधी) : “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील राज्यातील आदर्श शाळा तथा मॉडेल स्कूल म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेला नुकतीच शुक्रवार दि. ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हास्तरीय परीक्षण समितीने भेट देऊन शाळेची पाहणी केली.
यावेळी खारेपाटण केंद्र शाळेची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हास्तरीय समितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हाच्या प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी नीलिमा नाईक, उपशिक्षणाधिकारी फारूखी अहमदी, उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, सिंधुदुर्ग जिल्हा डाएट कॉलेज अधिव्याख्याता डॉ. संदीप पवार आदी मान्यवर अधिकारी वर्गाचा समावेश होता. खारेपाटण जि. प. केंद्र शाळेच्या वतीने शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी यांनी “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत शाळेला भेट देण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खारेपाटण जि. प. केंद्र शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळांचे मूल्यमापन करून राज्यातील आदर्श शाळांचे नामांकन करून त्यांना प्रोस्थाहन देण्यात येत असते. या अंतर्गत खारेपाटण जि. प. केंद्र शाळेची कणकवली तालुक्यातून निवड झाली असून आता ही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत तपासणी करीता आलेल्या जिल्हास्तरीय समितीने खारेपाटण केंद्र शाळेची अंतरंग व बाह्यरंग यांसह शाळेची भौतिक सोयी सुविधांची संपूर्ण पाहणी केली. याबरोबरच शासनाने ठरवून दिलेल्या प्रश्नावली व निकषाप्रमाणे संपूर्ण शाळेची तपासणी केली. यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे, सहाय्यक शिक्षिका आरती जोजेन, समिधा राऊत, दीपिका चव्हाण, शिवलीला निडसोसी, अबिदा काझी आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.












