कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दिलेल्या जोरदार धडकेत एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास पिंगुळी-मोरजकरवाडी येथे घडली. आशा सोनू धुरी (वय ६५, रा. पिंगुळी-धुरीटेंबनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून दोडामार्ग-सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती सुझुकी एक्स एल ६ या कारने पादचारी आशा धुरी यांना जोराची धडक दिली. आशा धुरी या आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी घरकामासाठी पायी जात असताना हा अपघात घडला.
कारचा वेग इतका प्रचंड होता की धडक दिल्यानंतरही सदर कार सुमारे ३५ ते ४० मीटर अंतरावर जाऊन थांबली. अपघाताची माहिती मिळताच पिंगुळी-धुरीटेंबनगर व मोरजकरवाडी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस तसेच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संबंधित कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील वाढते अपघात आणि भरधाव वाहनांमुळे स्थानिक नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या मार्गावर वेगमर्यादा आणि कडक नियंत्रणाची मागणी होत आहे.
भरधाव कारच्या धडकेत वृद्ध महिला ठार












