वैभववाडी तालुक्यात ५४.७९ टक्के शांततेत मतदान

१७ उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व पाच पंचायत समिती गणासाठी ५८ मतदान केंद्रावर सुमारे ५४.७९  टक्के शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात एकूण ३१ हजार ९९१ मतदार असून यापैकी  १७ हजार ५२९मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ८ हजार ५८९ पुरुष तर ८ हजार ९४० स्त्री मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात कुठेही कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडलेली नाही. जिल्हा परिषदेच्या दोन जागासाठी चार तर पंचायत समितीच्या पाच जागासाठी १३ असे एकूण १७  उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटी बंद झाले आहे.

वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे व लोरे गटासाठी त्याचप्रमाणे भुईबावडा, कोळपे, उंबर्डे, खांबळे, लोरे पंचायत समिती गणासाठी शनिवारी मतदान झाले. मतदान शांततेत व सुव्यस्थीत व्हावे यासाठी प्रशासने कंबर कसली होती. अतिशय चांगले नियोजन केल्यामुळे कुठेही कसलीही गडबड, गोंधळ झाला नाही.  सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी अतिशय चांगले नियोजन केले होते. याबाबत कर्मचारी व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा काम करीत होती.

सकाळी ७. ३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी ३० टक्के मतदान झाले. दुपारी १. ३० वाजेपर्यंत ४३. २० टक्के मतदान झाले होते. तर दुपारी ३. ३० वाजेपर्यंत ४९. १७ टक्के म्हणजे १५ हजार ७२९ मतदारांनी मतदान केले. तर सायंकाळी ५. ३० वाजेपर्यंत ५४. ७९ टक्के मतदान झाले.

सर्वात कमी मतदान नावळे केंद्रावर ३८. ५५ टक्के इतके झाले. तर सर्वात जास्त लोरे मतदान केंद्रावर ६८. ८९ टक्के मतदान झाले आहे.

तालुक्यातील नाधवडे येथे सकाळी एक मशीन बंद पडल्यामुळे काही वेळासाठी मतदानात खंड पडला होता. मात्र याठिकाणी तातडीने नवीन मतदान यंत्र देऊन मतदान सुरळीत सुरु करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

error: Content is protected !!