भाविकांसाठी दर्शन व महाप्रसादाचा योग
कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित श्री स्वामी समर्थ महाराजांची पवित्र पालखी पादुका परिक्रमा सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी नाडकर्णी नगर, कलमठ येथे भक्तिभावपूर्ण वातावरणात दाखल होणार आहे. ही परिक्रमा यंदा २९ व्या वर्षात पदार्पण करत असून, राजेंचे व बाबांचे आशीर्वाद लाभलेल्या या सोहळ्याची परिसरात उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे.
पालखी आगमनानंतर सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत महाआरती संपन्न होणार असून, दुपारी ११.४५ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या नामघोषाने व भक्तीमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे.
हा धार्मिक सोहळा कै. विश्वनाथ शंकर रासम यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात येत असून, श्री. विश्राम विश्वनाथ रासम परिवार व श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, नाडकर्णी नगर, कलमठ यांच्या वतीने भाविकांचे आदरपूर्वक स्वागत करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री. विश्राम विश्वनाथ रासम यांचे निवासस्थान ‘पुण्याई प्रासाद’, नाडकर्णी नगर, कलमठ, ता. कणकवली येथे करण्यात आले आहे.
या पवित्र पालखी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.












