कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर, अंगात पांढरा सदरा आणि विजार, गळ्यात बाराही महिने भगवा दुपट्टा डोक्यावर संघाची काळी टोपी ही वेशभूषा असलेली व्यक्ती कोल्हापूरकरांना मुख्यत्वे करून महाद्वार रोडवरील मंडळींना अनोळखी नाही. प्र. द. गणपूले म्हटलं की वांगीबोळा समोरील महाद्वार रोडवर आबा टेलरच्या शेजारील जागेवर सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत पेपर वाचत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या नमस्कारचा स्वीकार करणारी व्यक्ती होय. संपूर्ण आयुष्यभर निष्ठावान भाजपचे पदाधिकारी, फेरीवाले झोपडपट्टी धारक कष्टकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणारे अशी त्यांची ओळख. शुक्रवारी दुपारीच त्यांची प्राणज्योत मावळल्याने शनिवारपासून महाद्वार रोड आता या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाला कायमचा पोरका झाला आहे.
गणपूले यांना भाऊसाहेब असेही प्रेमाने सर्व मंडळी संबोधत असत. त्यांचे आणि महाद्वार रोडवरील प्रत्येक व्यक्तीचे एक वेगळेच नाते गेल्या पाच ते सहा दशकापासून पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या गप्पा, समाजकारणातील विषय भाऊसाहेब कायमच आपले परखड विचार मांडत असत. पूर्वीच्या जनसंघापासून ते आत्ताच्या भारतीय जनता पार्टीपर्यंत प्रत्येक घडामोडीचे ते साक्षीदार होते. वांगीबोळ-महाद्वार रोड परिसरात राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आपुलकी होती. प्रत्येकासाठी ते घरातील एक सदस्य असल्यासारखे होते. त्यामुळे राष्ट्रीय सण असो, आनंदउत्सव असो किंवा अन्य कोणताही उपक्रम महाद्वार रोडवरील प्रत्येक कार्यक्रमांमध्ये भाऊसाहेबांची उपस्थिती ही ठरलेली असायची. त्यांनी कधी लग्न केले नाही त्यामुळे संसार नातेवाईक अशात ते कधीच अडकले नाहीत. महाद्वार रोडवरील कष्टकरी, शहरातील झोपडपट्टी धारक, हात गाडीवाले यांचेच प्रश्न हेच त्यांचे कुटुंबीय. ते कायमच स्वावलंबी जगणे पसंत करत होते. महाद्वार रोडवरील काही मंडळींनी भाऊ साहेबांसाठी काकडे बोळात खोलीची व्यवस्था केली होती. तेथील एक खाट, पंचानन मासीकाची पुस्तके, आणीबाणी काळातील वर्तमानपत्राची काही कात्रणे, पक्षाचे जुने फोटो हीच काही ती त्यांची प्रॉपर्टी. प्रसंगी चुरमुरे फुटाणे खाऊन त्यांनी दिवस काढले होते. कोल्हापुरात भारतीय जनता पक्ष रुजवण्यात सुभाष वोरा, ज. गो. कुलकर्णी आणि भाऊसाहेब यांच्यासारखे मोजकेच लोक होते. वांगी-बोळातील पक्ष म्हणून अनेकदा त्यांची हेटाळणीही होत असे. अनेकदा अन्य राजकीय पक्षातील मंडळी यावरून चेष्टा मस्करी करत असत. पण भाऊसाहेबांनी कधीही राग मनात धरला नाही. शेवटपर्यंत निष्ठेने ते पक्ष संघटनेचे काम करत राहिले. गेल्या बारा वर्षात भाजपला सुगीचे दिवस आले आहेत. पक्षाने आणीबाणीतील राजे बंदी असलेल्यांसाठी सुरू केलेल्या मानधनाचा लाभ त्यामुळे भाऊसाहेबांनाही मिळत होता. पण सत्तेत आलेल्या पक्षाने आमच्यासाठी अजून काहीतरी करावे वगैरे अशी लालसा कधीही त्यांनी बोलूनही दाखवली नाही किंवा मनातही आणली नाही. आज भाऊसाहेब संपूर्ण महाद्वार रोडला कायमचे पोरके करून गेले आहेत. इथून पुढे महाद्वार रोडवरील त्या कॉर्नरवर ते कधीच बसलेले दिसणार नाहीत. पण रोड वरून येणाऱ्या जाणाऱ्याला मात्र एक क्षणभर का होईना मोकळी जागा पाहून त्यांची आठवण मात्र कायमच येणार.
आणि भविष्यवाणी खरी ठरली
इन बिन साडेतीन कार्यकर्त्यांचा पक्ष अशी एकेकाळी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीने कोल्हापुरात आपला महापौर शुक्रवारी बसवला. पण याची भविष्यवाणी गणपूले यांनी कित्येक वर्षा आधी केली होती . कोल्हापूर महापालिका स्थापन झाल्यानंतर जनसंघ (भाजप) च्या काही स्थानिक नेत्यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये भाऊसाहेबांचाही सहभाग होता. ते निवडून जरी आले नसले तरी त्यांनी तेव्हा एक ना एक दिवस माझ्या पक्षाचा नगराध्यक्ष होईल असे विधान केले होते. त्यावेळी अनेकांनी त्यांना खुळ्यात काढले होते. पण शुक्रवारी ते एकीकडे जगाचा निरोप घेत होते तर दुसरीकडे भाजप पक्षाच्या पहिल्या महापौर सभागृहात विराजमान होत होत्या. पक्ष कार्यकर्त्यांनी तर अख्खा महापालिका चौकच गुलाबी केला होता. स्वर्गाकडे मार्गक्रमण करत असताना भाऊसाहेब मात्र नक्कीच समाधानाचे हास्य घेऊन परमेश्वराला म्हणत असावेत शेवटी माझे खरे ठरले ना.
तुम्ही लिहून घ्या मी आलोच
भाऊसाहेब जसे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत होते तसेच ते शैक्षणिक क्षेत्रातही काही काळ कार्यरत होते. ४५ ते ५० वर्षांपूर्वी ते विद्यार्थ्यांची शिकवणी वांगीबोळात घेत असत. एक दिवस शिकवणी घेत असतानाच फळ्यावर लिहिलेला अभ्यास त्यांनी विद्यार्थ्यांना लिहायला सांगितला आणि तुम्ही लिहून काढा मी तोवर रेल्वे स्थानकावर एक आंदोलन आहे ते करून येतो असे सांगितले. विद्यार्थ्यांनी लिहून झाल्यावर एक तास दोन तास वाट पाहिली भाऊसाहेब काही आलेच नाहीत. त्यानंतर रवी देशपांडे, शेखर धर्माधिकारी, केशव स्वामी अशा काही निवडक विद्यार्थ्यांनी जाऊन माहिती घेतली असता भाऊसाहेबांना आंदोलनादरम्यान अटक झाल्याची माहिती मिळाली. आजही हा जुना किस्सा वांगी बोळात प्रचलित आहे.












