खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज मतदानाच्या दिवशी चक्क नवीन वधुवर दांपत्याने लग्नाचे सात फेरे आटपून थेट मतदान केंद्रावर जात आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावत जनसामन्यात लोकशाही बळकट करण्याचा संदेश दिला.
खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील तळेरे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिडवणे गावातील रहिवासी सिद्धेश सुरेश कांबळे यांचा विवाह वारगाव येथील श्रुती मधुकर धावडे हिच्याशी संपन्न झाला.दोघा नव दांपत्यानी या पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार राजेश जाधव यांना मतदान करण्यासाठी जि.प.शाळा शिडवणे व जि.प.शाळा वारगाव या एकाच पंचायत समितीतील दोन मतदान केंद्रावर जाऊन विवाहाचे कर्तव्य पार पाडत आपला मतदानाचा पवित्र हक्क देखील बजावला.त्याच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी माजी जि.प. बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये,उपसरपंच दीपक पाटणकर,तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल पांचाळ,वारगाव उपसरपंच नाना शेट्ये,बूथ अध्यक्ष महेंद्र टक्के व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तळेरे पंचायत समितीचे उमेदवार राजेश जाधव यांनी नव दाम्पत्यांचे स्वागत करत त्यांना शुभ आशीर्वाद दिले व आभार देखील व्यक्त केले.












