कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती निवडीसाठी विशेष सभा पीठासन अधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती. या विषय समितीच्या निवडीबाबत सत्ताधारी गटाने पत्र देत विरोध केला. तर विरोधी गटाने विषय समिती गठीत करावी म्हणून मागणी केली. अखेर या निर्णयासाठी नगरसेवकांची हात उंचावत मतदान घेतले. समसमान मतदान झाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्या चिठ्ठीत समिती स्थापन करण्याचा निर्णय नाही असा आला. त्यानंतर नगरपंचायतचे कामकाज करण्यासाठी स्थायी समिती गठीत करणे क्रमप्राप्त असल्याचे पीठासन अधिका-यांनी सांगितले. त्यावर विरोधी गटाने सदस्य कोण कोण घेणार ? अशी विचारणा केली. त्यावेळी पीठासन अधिका-यांनी नगराध्यक्ष या समितीचे पदसिध्द अध्यक्ष असतील तर उपनगराध्यक्ष सदस्य व अन्य 3 किंवा काही सदस्य निवडीचा अधिकार सभागृहाला आहे, असे सुचित केले. त्यावर दोन्ही गटाकडून काही सुचना मांडण्यात आल्या. मात्र, स्थायी समिती गठीत करण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांकडून अधिकचे मार्गदर्शन मागून पुन्हा सभेचे आयोजन करण्याचे जाहीर केले. त्यामुळे या सभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये वादंग निर्माण झाला होता.
नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती निवडीसाठी न. पं. प. पू. भालचंद्र सभागृहात विशेष सभा आयोजित केली होती. यावेळी पीठासीन अधिकारी गौरी पाटील, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, गटनेते राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, लूकेश कांबळे, बाळू पारकर, जाई मुरकर, सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, भाजपच्या गटनेत्या सुप्रिया नलावडे, नगरसेवक राकेश राणे ,स्वप्निल राणे ,संजय कामतेकर, बंडू हर्णे ,मेघा गांगण ,मेघा सावंत ,आर्या राणे, प्रतीक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
विषय समित्या स्थापन होणार नसल्याने स्थायी समिती स्थापन कशी करणार, असा सवाल नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला असता पीठसन अधिकारी गौरी पाटील यांनी स्थायी समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. यावेळी सुप्रिया नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे, संजय कामतेकर, मेघा गांगण यांनी हा निर्णय कायद्याला धरून नसल्याचा मुद्दा मांडला. त्याचप्रमाणे विषय समिती नसतील तर आम्हाला स्थायी समितीत सहभाग व्हायचे नाही. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनीच कारभार चालवावा, सत्तेत कुणालाही वाटेकरी करून घेऊ नका, असा आरोप बंडू हर्णे यांनी केला. यावेळी सत्ताधारी गटाकडून गटनेते रुपेश नार्वेकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, स्वीकृत नगरसेवक बाळू पारकर यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढताना आम्ही तुम्हाला स्थायी समितीत घेण्यास तयार असताना विनाकारण विरोध का करता ? सभागृहाने घेतलेला निर्णय मान्य न करणे ही अडवणूक आहे, असा टोला सुशांत नाईक यांनी लगावला.
त्यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत स्थायी समितीचे नगराध्यक्ष, उनगगराध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असून सत्ताधारी व विरोधकांचा एक एक सदस्य तर एक सदस्य चिठ्ठीद्वारे निवडूयात आणि महिला व बालकल्याण समिती स्थापन होणार नसल्याने महिलांना स्थायी समितीत द्यावे, असे प्रस्ताव श्री. पारकर यांनी सभागृहात मांडला. मात्र, सुप्रिया नलावडे, बंडू हर्णे यांनी आम्हाला तुमच्या स्थायी समितीत यायचे नाही. तुम्ही कुशाल कारभार करा, असा सांगितले. त्यावेळी नगरसेविका मेघा गांगण यांनी विषय समित्या स्थापन न करता तुम्ही नगरसेवकांच्या हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोप केला.
या स्थायी समिती निवडीबाबत भाजप आणि शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. यावर पिठासीन अधिकारी गौरी पाटील यांनी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करून निर्णय देण्यात येईल असे सांगितले. यामुळे सभा काही वेळ स्थगित करण्यात आली. ३० मिनिटांनंतर तहकूब झालेली सभा पुन्हा सुरू झाली. स्थायी समितीची निवड करणे कायदेशीररित्या बंधनकारक असल्याची बाब गौरी पाटील यांनी सदस्यांचा निदर्शनास आणून दिली. यावर संदेश पारकर यांनी मध्यस्थी करत विरोधकांना प्रस्ताव दिले. मात्र, विरोधकांनी हे प्रास्ताव मान्य केले नाही. स्थायी समिती सदस्य निवडीबाबत विरोधकांनी आक्षेप नोंदवला त्यामुळे पीठासन अधिकारी गौरी पाटील यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे मार्गदर्शन घेऊन विशेष सभा घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जाहीर केले.












