कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री जिल्हा परिषद निवडणूकीतील अदृश्य शक्ती असा उल्लेख करतात.जर पालकमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्या अदृश्य शक्तीचे नाव जाहीर करावे. लोकसभेला ज्या अदृश्य शक्तीने 1 हजार वाटले, आणि मालवण विधानसभेला 3 हजार वाटले तीची ही अदृश्य शक्ती आहे काय ? फोंडयात आणि नेरूर मध्ये अपक्ष जि प सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारी हीच अदृश्य शक्ती आहे काय ? असा सवाल ठाकरे सेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत केला. जिल्हा परिषद निवडणूकीत निवडून आलेले अपक्ष उमेदवार भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव घेतात. जर हिंमत असेल तर पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परिषद निवडणूकितील अदृश्य शक्ती चे नाव घ्यावे असे आव्हान माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिले. बॅ. नाथ पै, मधु दंडवतेंसारख्या विचारवंतांचा असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आज विरोधी उमेदवार विकत घेऊन बिनविरोध सदस्य निवडून आणणारा बनला आहे. पालकमंत्री नितेश राणेंनी कणकवली विधानसभा मतदारसंघात विरोधी उमेदवार विकत घेण्याची कुप्रथा सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसारख्या नेत्याला साध्या शिवसैनिकांनी पराभूत केले. हे लक्षात ठेवा. बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक विकला जात नाही.जे उमेदवार विकले गेले ते आयाराम गयाराम होते. त्यांचे राजकारणातील स्थान संपले आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेना संपली असे भाजपा नेत्यांनी म्हणू नये. ठाकरेंचे शिवसैनिक पुन्हा जोमाने पेटून उठतील आणि नव्याने शिवसेना संघटना उभारी घेईल असा विश्वासही माजी आमदार उपरकर यांनी व्यक्त केला.
नितेश राणे…. हिंमत असेल तर अदृश्य शक्तीचे नाव घ्या












