सरपंच विश्वनाथ खानविलकर यांचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील कोर्ले या गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये पोभुर्ले व पुरळ जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित जि.प. सदस्य व पं.स. सदस्याचा सत्कार कार्यक्रम देवगड तालुका भाजप मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोर्ले ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला. कोर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचा गेल्या पाच वर्षातील कार्यकाळ दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी संपत असल्या कारणाने गावचे सरपंच विश्वनाथ खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य बरोबरच गावातील सर्वच क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. तर यानिमित्ताने गावातील महिलांसाठी हळदीकुंकू व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्याचा निरोप समारंभाचे देखील आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते.
यावेळी पोंभुर्ले जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नारकर, पुरळ जिल्हा परिषद सदस्य संजय बोबडी, पोंभुर्ले पंचायत समिती सदस्य सादिक डोंगरकर, फणसगाव पं.स.सदस्य कुमारी समृद्धी चव्हाण, पडेल पं.स.सदस्य अंकुश ठुकरुल, देवगड पं.स. माजी सभापती रवी पाळेकर पडेल सरपंच श्री भूषण पोकळे, पोंभुर्ले सरपंच प्रियंका धावडे, धालवली उपसरपंच अनिल राणे वघिवरे माजी सरपंच संतोष चव्हाण, कुणकवण माजी सरपंच मंगेश गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी नवनिर्वाचित पोंभुर्ले जि.प.सदस्य अनुराधा नारकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महारांजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यानंतर कोर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने गावचे सरपंच विश्वनाथ खानविलकर यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर भाजप मंडल अध्यक्ष बंड्या नारकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षात सदस्य म्हणून जनतेचे कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नारकर यांनी कुशल संघटक आणि समाज कार्यासाठी प्रामाणिकपणे वाहून घेणारा कार्यकर्ता अशा शब्दात कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर यांचा विशेष उल्लेख केला. तर जि.प.सदस्य नारकर व मंडल अध्यक्ष बंड्या नारकर यांच्या शुभहस्ते कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना,”पद असो वा नसो सदैव आपल्या गावच्या विकासासाठी शेवट पर्यंत आपण झटत राहणार असून गावचा कारभार हाकताना गावकऱ्यांनी दिलेली खंबीर साथ मी कधीच विसरणार नाही असे भावपूर्ण उदगार यावेळी कोर्ले सरपंच श्री विश्वनाथ खानविलकर यांनी आपल्या सत्कार प्रसंगी काढले.
यावेळी गावातील महिलांसाठी आयोजित करण्यात असलेल्या हळदी कुंकू समारंभाचा शुभारंभ जि.प.सदस्य नारकर व पं.स.सदस्य कुमारी समृद्धी चव्हाण यांच्या शुभहस्ते महिलाना वाण वाटून करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपसरपंच सुनील कांबळे यांनी केले. तर सर्वांचे आभार ग्रामविकास अधिकारी पाताडे यांनी मानले. या कार्यक्रमाला कोर्ले गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












