जि. प. शाळा चिंदर भटवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर वर्धापन दिनानिमित्त आज शनिवारी, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडी शाळेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांद्वारे सादर केले जाणारे ‘श्री सार्थ राम रक्षा पठण’ कार्यक्रम. इयत्ता पहिली ते चौथीच्या चिमुरड्यांनी अत्यंत शुद्ध साहित्यात तयार केलेले हे रामरक्षा पठण केवळ संस्कृतमध्ये नसून, त्याचे मराठी अनुवादासह सादरीकरण केले जाणार आहे.
रात्री ९ वाजता हा कार्यक्रम श्री रामेश्वर मंदिर येथे सुरू होणार असून शालेय वयातच विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व्हावेत आणि संस्कृत भाषेची गोडी लागावी, हा या कार्यक्रमाचा प्रामाणिक उद्देश आहे. सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी वर्ग यांनी या भक्तीमय सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट, बारा पाच मानकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.












