खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेली कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेने कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून आता ही शाळा या अभियानात अंतर्गत जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. शाळेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर व त्यांच्या सहकारी शिक्षकांचे आणि शाळेचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
खारेपाटण जिल्हा परिषद केंद्र शाळा नं. १ ही राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल म्हणून ओळखली जाणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत शाळा असून सलग तीन वर्षे या शाळेने शासनाच्या “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमात सहभाग घेत आपले सादरीकरण केलेले आहे. नुकत्याच या शाळेला जिल्हास्तरीय परीक्षण समितीने भेट देऊन या शाळेची संपूर्ण पाहणी केली असून शाळेचे अभिलेख दप्तर तपासणी, शाळेतील उपलब्ध भौतिक सोयी सुविधा यांसह शालेय अभ्यासक्रमाबरोबरच शाळेत राबविण्यात येत असलेल्या सह शालेय उपक्रमाची तपासणी यावेळी करण्यात आली.
खारेपाटण केंद्र शाळेने अद्यावत ठेवलेले शालेय रेकॉर्ड व शाळेचा असलेला सुंदर परिसर आणि विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी गुणवता यादीत यश प्राप्त करत असलेले शालेय विद्यार्थी यामुळे शाळेच्या नावलौकिकात निश्चितच भर पडलेली असून या शाळेत कार्यरत असलेली शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेच्या विकासाठी खूप मेहनत घेत असून या समितीचा देखील शाळेच्या या यशात मोठा सिंहाचा वाटा आहे.
खारेपाटण जिल्हा परिषद केंद्र शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल नुकताच या शाळेचा खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाचे नवनिर्वाचित सदस्या प्राची ईसवलकर व पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन शाळेचे अभिनंदन केले आहे. तर शाळेच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व खारेपाटण हायस्कूलच्या वतीने नुकताच केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व प्राचार्य संजय सानप यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुषगुच्छ देऊन विशेष सत्कार खारेपाटण हायस्कूल येथे करण्यात आला.
खारेपाटण केंद्र शाळेच्या या यशाबद्दल जि. प. केंद्र शाळा खारेपाटण नं. १ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष
पाटणकर, गौरी शिंदे, उपाध्यक्ष प्रियंका गुरव, समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे, संध्या पोरे आदी पदाधिकारी यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर व सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले आहे.












