महाराष्ट्र राज्य शैशणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने करण्यात आले अभिनंदन

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने नुकतेच राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाच्या अंतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी करण्यात आलेल्या स्वयं. शाळा मूल्यांकनामध्ये विशेष बाब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कणकवली तालुक्यातील आणि खारेपाटण या गावातील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या एकमात्र शाळेची निवड झाली असून या शाळेला ‘अ’ प्लस श्रेणी प्राप्त झाली आहे. याबाबतचे नुकतेच अभिनंदनीय पत्र डॉ. हेमंत वसेकर (संचालक, महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे) यांच्याकडून शाळेला प्राप्त झाले आहे.
खारेपाटण हायस्कुलने नुकतेच “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानात कणकवली तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला होता व त्यानंतर राज्याच्या शालेय मूल्यांकनामध्ये देखील या शाळेची अभिनंदनीय निवड झाल्याबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर व सर्व संस्था विश्वस्त यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप व पर्यवेशक संतोष राऊत तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे संस्थेच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. तर शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप यांचे नुकतेच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या वतीने पुषगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वयं मूल्यांकनामध्ये राज्यातीलं सुमारे १,०२,६७५ शाळांनी सहभाग घेत सन २०२४-२५ या वर्षी आपले मूल्यांकन पूर्ण केले होते. याचा निकाल सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षी जाहीर करण्यात आला असून राज्यातील फक्त १०,६४४ शाळांची विविध निकषानुसार तपासणी करून त्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे बाह्य मूल्यांकनानंतर त्रयस्थ पक्षद्वारे राज्यातील ४२९ शाळांना ‘अ’ प्लस श्रेणी प्राप्त झाली असून या निवडीत तथा या मूल्यांकनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक विभागातील खारेपाटण हायस्कूल या शाळेची निवड झाली आहे.
शाळेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गट विकास शिक्षणाधिकारी आणि शाळेला ‘अ’ + श्रेणी प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने लेखी पत्र पाठवून करण्यात आले आहे.












