शालेय शिक्षणमंत्री व सिंधुदुर्ग,रत्नागिरी पालकमंत्री आणि शिक्षणाधिका-यांच्या बैठकीत निर्णय
शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्ग अध्यक्ष संजय वेतुरेकर यांची माहिती
तळेरे (प्रतिनिधी) : कोकणातील डोंगरी भागातील अनेक शाळांना टाळे ठोकणारा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णयाला अखेर एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे.मुंबईत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर व सचिव महेश पाटोळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मच्छी व बंदर विकास मंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे,आम. ज्ञानेश्वर म्हात्रे, रत्नागिरी रायगड, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत हा दिलासादायक निर्णय झाला आहे.
15 मार्च 2024 चा जीआर राज्यात लागू होणार होता. या जीआर च्या विरोधात राज्यात प्रथमच शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्गच्यावतीने संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक,
शिक्षक, ग्रामस्थासह प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला सामोरे जात पालकमंत्री नितेश राणे यांनी मार्गदर्शन करताना हा शासन निर्णय थांबण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन आणि जिल्ह्यातील एकही शाळा बंद पडू देणार नाही असा शब्द मोर्चेकऱ्यांना दिला होता.
अनेक शाळा बंद करणारा आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांना देशोधडीला लावणारा , विद्यार्थ्याच्या शिक्षण हक्कावर गंडांतर आणणारा १५ मार्चचा या शासन निर्णयाला सध्यातरी एक वर्षासाठी स्थगिती मिळाली आहे.याबद्दल शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्गच्यावतीने अध्यक्ष संजय वेतुरेकर व सचिव महेश पाटोळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आभार मानले आहे.
निश्चितपणे अशा आहे की, १५ मार्चच्या हा शासन निर्णय पूर्णतः रद्द होण्यासाठी आमची पुढेही वाटचाल राहील. हा शासन निर्णय कायमचा रद्द करावा अशीही मागणी संजय वेतुरेकर व महेश पाटोळे यांनी केली आहे.












