संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचा २५ फेब्रुवारीला सन्मान

बेलापूर येथील सिडको भवनात होणार कार्यक्रम; सिंधुदुर्गातील सहा ग्रामपंचायतींचा गौरव

ओरोस (प्रतिनिधी) : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या कालावधीत विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा तसेच विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा सन्मान सोहळा बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता सिडको कार्यालय सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अजिंक्य सावंत यांनी दिली.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत हुमरस यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सन २०१९-२० मध्ये देवगड तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीने प्रथम तर वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकाविला.

सन २०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला असून वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या सर्व पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचा सन्मान विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे.

error: Content is protected !!