सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून आता अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले आहेत.
ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांची पहिली बैठक आयोजित करणे आवश्यक आहे.
शासनाच्या निर्देशानुसार, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पहिल्या बैठका २० मार्च २०२६ पूर्वी आयोजित कराव्यात. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती आणि उपसभापती यांची निवड केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या निवडणुका पार पडल्या असून, आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सत्तास्थापना, राजकीय समीकरणे आणि अध्यक्षपदाच्या निवडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर विविध पक्षांकडून हालचाली सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील प्रशासनिक कामकाजाला वेग मिळणार असून विकासकामांनाही गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.











