पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून समाजाभिमुख उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कणकवली भाजपाचे सचिव समीर प्रभुगांवकर यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी जपत दहावी उत्तीर्ण दोन विद्यार्थिनींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यात आली. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या विद्यार्थिनींना याचा मोठा आधार मिळणार आहे.

याअंतर्गत बोर्डवे येथील विद्यार्थिनी कु. वैष्णवी येंडे हिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी समीर प्रभुगांवकर यांनी स्वीकारली. तसेच ओसरगाव येथील प्रसिद्ध उद्योजक संतोष कदम यांनी ओसरगाव येथील विद्यार्थिनी कु. हर्षाली धोत्रे हिच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांपुरते कार्यक्रम न ठेवता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदतीचा हात देणे हीच वाढदिवसाची खरी भेट असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी बोर्डवेचे माजी सरपंच राजू मोडक, बूथ अध्यक्ष प्रकाश पेडणेकर, ओसरगावच्या सरपंच सुप्रिया कदम, उद्योजक संतोष कदम तसेच वागदेचे माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगत अशा सामाजिक उपक्रमांतून अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे संबंधित विद्यार्थिनी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आयोजकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!