पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सौजन्याने ५ हजार वह्यांचे वाटप
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सौजन्याने खांबाळे पंचायत समिती मतदारसंघात शैक्षणिक साहित्य वितरण व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ पूर्ण प्राथमिक शाळा सांगूळवाडी नं. १ तसेच केंद्रशाळा खांबाळे नं. १ येथे करण्यात आला.
यावेळी खांबाळे पंचायत समिती मतदारसंघातील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट फोल्डर, सन्मानचिन्ह तसेच लाँग बुक प्रदान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच मतदारसंघातील सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना छत्री, वह्या, पेन, कंपास पेटी तसेच अन्य शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सुमारे ५ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच खांबाळे गावातील प्राथमिक शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना माजी उपसरपंच उमेश पवार यांच्या मार्फत छत्र्यांचे वितरण करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वेळेवर उपलब्धता व्हावी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, हीदेखील या उपक्रमामागील प्रमुख भूमिका असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मंगेश लोके हे गेली सुमारे ३० वर्षे शिक्षण क्षेत्रासाठी सातत्याने योगदान देत असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच शाळांच्या विविध उपक्रमांना सहकार्य करत आहेत. शिक्षण हीच समाज परिवर्तनाची प्रभावी शक्ती असल्याच्या भावनेतून त्यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही अविरत सुरू आहे.
पूर्ण प्राथमिक शाळा सांगूळवाडी नं. १ येथे आयोजित कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्यासह स्नेहल भोवड, माजी सरपंच प्रकाश पाटील, प्रवीण रावराणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर रावराणे, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान सुतार, केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव, मुख्याध्यापिका स्नेहलता राणे, माजी सरपंच गौरी रावराणे, ग्रामपंचायत अधिकारी विद्याधर सावंत, सेवानिवृत्त शिक्षक सुहास रावराणे, निवृत्त बँक कर्मचारी मंगेश रावराणे तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिक्षक गीता टक्के, समीर सरवणकर व रेणुका केंगार उपस्थित होते.
केंद्रशाळा खांबाळे नं. १ येथे झालेल्या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजन साळुंखे, केंद्रप्रमुख नितीन कदम, माजी सरपंच गणेश पवार, विठोबा सुतार, नाबार्डचे सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर सकपाळ, सोसायटीचे माजी चेअरमन दीपक चव्हाण, माजी उपसरपंच उमेश पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष लवू पवार, महेश चव्हाण, मुख्याध्यापिका जयश्री शेट्ये, शिक्षक हनुमंत सुतार, जयेश पवार, दिनेश पालकर, अमित कर्पे, शांताराम कदम, संकेश पवार, परशुराम गुरव, सूर्यकांत सुतार यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नाबार्डचे सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर सकपाळ, केंद्रप्रमुख नितीन कदम तसेच पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची आवश्यकता तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले.
उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत शिक्षण क्षेत्रासाठी सुरू असलेल्या या कार्याचे कौतुक केले.











