गायिका मुग्धा गावकर यांच्या सुरेल आवाजाने रसिक मंत्रमुग्ध

खारेपाटण (प्रतिनिधी) : नूतन संवस्तर स्वागतानिमित संतोष रानडे व दीपा रानडे राहणार नवीन रामेश्वर नगर, खारेपाटण या कुटुंबियांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मराठी नव वर्षाच्या शुभारंभप्रसंगी व गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला बुधवार दि. १८ मार्च २०२६ रोजी “स्वरसाधना” हा संगीत व गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गोवा येथील प्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर व त्यांच्या सहकारी कलाकार यांच्या सुरेल आवाजांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

खारेपाटण नवे रामेश्वर नगर याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या “स्वरसाधना” कार्यक्रमात गायिका मुग्धा गावकर यांनी आपल्या सुरेल आवाजात अभंग, भक्ती गीते व नाट्य गीते आदी विविध गाणी गायली. या कार्यक्रमाला खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खारेपाटण येथे संतोष रानडे कुटुंबियांच्या वतीने सलग १७ वर्षे मराठी नव वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम घेण्यात येत असून नुकताच १८ मार्च रोजी २०२६ रोजी सादर झालेला नवीन वर्ष स्वागताचा हा १८ वा कार्यक्रम असून यानिमित्ताने “स्वरसाधना” या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात गायिका मुग्धा गावकर (गोवा) यांसह त्यांच्या शिष्य सह कलाकार गायिका उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर निवेदन निबंध कानिटकर (संगमेश्वर) यांनी केले. तर या कार्यक्रमाला हार्मोनियम वादक प्रसाद शेवडे (देवगड) व तबला वादक अभिजीत जोशी (देवगड) यांची संगीत साथ लाभली. यावेळी खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक संदीप पेंडुरकर व त्याचे शिष्य खारेपाटण हायस्कुलचा विद्यार्थी पीयूष मांगले यांनी संगीत क्षेत्रात देशपातळीवर यश संपादन केल्याबद्दल त्यांचा गायिका मुग्धा गावकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संतोष रानडे यांच्या कुटुंबियांच्या वतीने मराठी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.













