हिंदू संस्कृती, पारंपारिक लोककला, नृत्यसादरीकरण, रोंबाटचा विलक्षण संगम
संस्कृती कला मंच व फोंडाघाट ग्रामस्थांचे यशस्वी नियोजन
फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : “पाडव्याचा सण आज, उभारा रे गुढी | मराठी वर्षाच्या स्वागता, फोंडावासियांची शोभा दिंडी ||” असा शुभेच्छा संदेश देत सलग बाराव्या वर्षी संस्कृती कला मंच फोंडाघाटच्या वतीने, गुढीपाडवा दिवशी आपल्या पारंपारिक लोककला, संस्कृती आणि रोंबाटचा समावेश असलेल्या भव्य शोभायात्रेचे यशस्वी नियोजन केले होते. सायंकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत चाललेल्या शोभायात्रेत तमाम अबालवृद्ध महिला-पुरुष, युवा-युवती, विद्यार्थीनी, गृहिणी, हिंदू संस्कृतीतील पारंपारिक-ऐतिहासिक रंगीबेरंगी वेशभूषेत आणि आभूषणासह तसेच भगव्या ध्वजासह मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. उत्कृष्ट आवाज नियोजनसह, विरेश रेवडेकर यांचे उपयुक्त संगीत नियोजनबद्ध संचालनामुळे उन्हाचा तडाखा कमी होताच जल्लोष २०२६ शोभायात्रा तालुक्याचे आकर्षण ठरले.
कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच संजना आग्रे यांनी श्रीफळ वाढवून करताना, या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सूत्रसंचालक कुमार नाडकर्णी यांनी संस्कृती कला मंचचे संस्थापक व अध्यक्ष स्व. सचिन नारकर यांची आठवण सर्वांना जाणवत असल्याचे सांगताना, त्यांच्या स्मृतीला सर्वांनी मानवंदना दिली. गेल्या बारा वर्षांपूर्वी सर्वांना बरोबर घेऊन आपले संस्कार, लोककला, इतिहास आणि त्यातून अभिजात मराठी नववर्षाचे जल्लोषी स्वागत व भव्य शोभायात्रा ! यांनी पेठेमध्ये चैतन्य निर्माण करत जनतेला शुभेच्छा देण्याची, स्व. सचिनची संकल्पना ! त्याच्या जाण्यानंतर संस्कृती कलामंचाचे भरत मोरे, प्रसाद बिडये ,श्रद्धा चोरगे, सुप्रिया रेवडेकर, ज्योती पॅरिस, विनिता म्हसकर, संदीप नानचे, वृषाली पवार, राजेंद्र पावसकर, तुषार नेवरेकर यांच्या परिश्रमपूर्वक सहकार्यातून, प्रिया सचिन नारकर मनापासून हा जल्लोषात स्वागताचा उपक्रम यशस्वी करीत आहेत. त्यास न्यू इंग्लिश स्कूल फोंडा, केंद्र शाळा नंबर एक, इंग्लिश मीडियम स्कूलचा बालचमु व टीचर्स तसेच ग्रामस्थ सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करीत आहेत. दरवर्षीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नववर्षाचे स्वागत अभूतपूर्व, जल्लोषात आणि ऊर्जा देणारे ठरले आहे.
कुडाळच्या भैरव जोगेश्वरी ढोलपथकाने गगनभेरी ढोलवादनाने सलामी दिल्यानंतर, बालचमु नी गणेशवंदना, नृत्ये सादर केली. यामधील देवांश दळवीने सादर केलेल्या गणपतीची वेशभूषा लक्षवेधी ठरली. त्यानंतर नेरुळच्या संतोष मेस्त्री यांच्या सादरीकरणात, पारंपारिक रोंबाट नृत्याला सर्व उपस्थित फोंडावासीयांनी एकच दाद दिली. त्यामधील रामाने रावणाचा हनुमंताच्या पाठीवरून केलेला लक्षभेद आणि मातेकडून राक्षस वध ही चलचित्रे सर्वांनाच आकर्षित करणारी ठरली. तर अभंगाच्या साथीने थिरकणाऱ्या बाल वारकऱ्यांच्या नृत्यांमध्ये वावरणारे, विविध भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा वावर हवशा-गवश्या ग्रामस्थांना सेल्फी घेण्यास भाग पाडत होता. यामध्ये बालमोरया दिशांत मेजारी याचा वावर सर्वांनाच भावला. यासह राक्षस, हनुमान, एलियन्स, कावळा, डायनासोर यांच्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. सर्वात आकर्षण ठरले ते हायस्कूलच्या मुला-मुलींनी सादर केलेल्या लोकनृत्य, वारकरी नृत्य, राधाकृष्ण नृत्य, गोंधळ-जोगतीन नृत्य, चैत्रपालवी- आकाशगंगा नृत्य, वारकरी नृत्य ! समय सूचक मराठी परंपरा जागवणारी गीते सोबत सुंदर पारकर यांचे प्रासंगिक माहिती देणारे सूत्रसंचलन यामुळे सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली शोभायात्रा रात्री उशिरापर्यंत चालू होती. नेहमीच ट्रॅफिकची समस्या असलेल्या पेठेमध्ये वाहतुकीचे नियोजन संजय नेरुरकर आणि कणकवलीहुन खास आलेले पोलीस महिला-पुरुष यांनी परिश्रमपूर्वक केले.
या शोभायात्रेमध्ये उपसरपंच तन्वी मोदी, नूतन जि. प. सदस्य राजन चिके, गणपत वळंजू, ईश्वरदास पावसकर, बबन हळदीवे, संतोष पावस्कर, सुरेश सामंत, दिनेश नारकर, आनंद मरिये, गुणेश कोरेगावकर, यशवंत मसुरकर, सुजाता हळदिवे, शेखर लिंग्रस, प्रसाद पारकर, रंजन नेरूरकर, दीपक सावंत-पटेल, राजू पटेल, संतोष टक्के, आप्पा पटेल, अरुण सामंत, एसटी कंट्रोलर, हेल्प अकॅडमी, पत्रकार मित्र, ज्येष्ठ नागरिक, ग्राम सखी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य आणि रिक्षा संघटना सहकारी आणि ग्रामस्त सामील झाले होते. त्यांचाही यथोचित गौरव करण्यात आला. या जल्लोष २०२६ शोभायात्रेचा सर्वांनी उत्सव समजून मनमुराद आनंद लुटला.














