चाकूने खुनी हल्ला करणाऱ्या महेश घाडीला १० वर्षे सश्रम कारावासासह दंड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पैशाच्या देवाण घेवाणीवरून शिवीगाळ करीत चाकू सारख्या हत्याराने एकाच्या हात व पायावर वार करुन व पोटात चाकू खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील वानिवडे मांगरवाडी येथील महेश चंद्रकांत घाडी वय ३८ वर्षे यांना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ सुधीर देशपांडे यांनी १० वर्ष सश्रम कारावास आणि ३२ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

३ मे २०२० रोजी हा गुन्हा घडला होता. आरोपी  जखमी महेश घाडी यांच्या कामाचा मोबदला दिला नसल्याच्या रागातून त्यांनी सुधीर लक्ष्मण रुमडे वय ६८ वर्षे यांना देवगड तालुक्यातील तळेबाजार साईनगर येथील राहत्या घरी येत चाकू सारख्या हत्याराने हातावर, पायावर वार करीत पोटावरील बेंबीजवळ चाकू खुपसला. यावेळी जखमी यांच्या पत्नी शैलजा सुधीर रुमडे वय  ६० वर्षे यांनी सोडविण्याचा प्रयत्न करीत आरडाओरडा केला. त्यानंतर शैलजा रुमडे यांनी देवगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

या प्रकरणाचा निकाल शुक्रवार २० मार्च रोजी लागला. यावेळी न्यायालयाने एकूण आठ साक्षीदार तपासले. यावेळी पत्नी, जखमी, शेजारीण शोभा कुबडे, तपासिक अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत नागवेकर, डॉ संदीप भगत यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीवर दाखल कलमातील भारतीय दंड संहिता, १८६० कलम ३०७ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड, १८६९ कलम ४५३ अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड, १८६० कलम ५०४ अन्वये एक वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यातील एकत्रित करून दहा वर्ष सश्रम कारावास आणि ३२ हजार रुपये दंड अशी शिक्षा भोगायची आहे.

फोटो: आरोपी महेश घाडी

error: Content is protected !!