डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर..
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली गावचे सुपुत्र असलेले कवी, लेखक, परिक्षक, स्तंभलेखक, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भिकाजी कांबळे (चिंचवलकर) यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सेवाभावी कार्याची दखल घेऊन तेजस्वी फाऊंडेशनने त्यांची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ पुरस्कारासाठी नुकतीच निवड केली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रती वर्षी तेजस्वी फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ अंतर्गत चिंचवलकर यांना ११ एप्रिल २०२६ रोजी ठाणे येथे सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन यापुर्वीही त्यांना अनेक सेवाभावी संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मिलिंद कांबळे चिंचवलकर हे गेली २५/३० वर्षे सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात कार्यरत असून आंबेडकरवादी मुल्यांवर आधारित समानता, बंधुता, सामाजिक न्याय, शिक्षण, मानवता आणि संविधानिक मुल्ये जपत आघाडीच्या अनेक वृत्तपत्रांतून विविध विषयांवर लिखाण केले आहे. तसेच त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि समाज भावना जपत कोविड सेंटर, पुरग्रस्त, होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, वैद्यकीय मदत, समाज मंदिर व स्मशानभूमीसाठी मोफत जमीन, बुद्ध विहार वाचनालयासाठी पुस्तके भेट, शाळा, बुद्ध विहारे यांना यथाशक्ती आर्थिक मदत, अडचणीतील तसेच कोरोना कालावधीत काही कुटुंबांना मदतीचा हात आशा प्रकारे त्यांनी आपली सेवाभावी वृत्तीही दाखवून दिली आहे.












