10 लाख किंमतीच्या खैर लाकडासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी (प्रतिनिधी) : साधारण आठ दिवसांपूर्वीच इन्सुली बांदा राज्य मार्गावर वनविभागाने खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पो पकडला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडून वनविभागाने एकच खळबळ उडवून दिली आहे. खैर झाडाच्या लाकडाची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी तळवडे येथील दोघांना सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मितेश शरद लोके आणि दीपक विठोबा हरमलकर अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल १० लाखाच्या खैराच्या साठ्यासह टेम्पो, असा मिळून २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री इन्सुली येथे करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टेम्पोमधून विनापरवाना खैराच्या लाकडाची मोठी खेप नेली जाणार होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने खामदेव नाका परिसरात सापळा रचला होता. संशयित टेम्पो येताच त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खैराचे लाकूड आढळून आले. पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. जप्त केलेला सर्व मुद्देमाल उपरल येथील विक्री आगारात जमा करण्यात आला आहे. ही धडक कारवाई वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप (आजगाव) आणि पाडलोसच्या वनरक्षकांनी पार पाडली.
दरम्यान रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, वनविभागाच्या या सातत्यपूर्ण धडाकेबाज कामगिरीमुळे खैर लाकूडची तस्करी करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे.










