गोपुरी आश्रमातर्फे दिनेश राणे यांचा सत्कार
कणकवली (प्रतिनिधी) : मराठी भाषेला फार मोठा इतिहास आणि पाठबळ आहे. त्यामुळे ही भाषा नष्ट होणारी नाही. मात्र, ग्लोबल युगात मराठी भाषिक पाल्यांना आपणास फादस, मम्मी बोलायचे शिकवत असतील तर त्यांच्यासारखे दुर्दैव नाही. तसेच माणूस जसा आहे, तसा जगण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याच्या जीवन प्रवासात त्याला अडचणी, आव्हाने, संघर्षाचा सामना करावा लागतो. त्याचा सामना कशाप्रकारे करावा पुस्तके माणसाला शिकवतात, असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक तथा सेवानिवृत्त शिक्षक जी. ए. सावंत यांनी व्यक्त केले.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहलायच्या निवडणुकीत दिनेश राणे यांची संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल गोपुरी आश्रमाच्यावतीने जी. ए. सावंत हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री.सावंत बोलत होते. यावेळी दिनेश राणे, नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे, आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, अलीकडच्या काळात वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी ही संस्कृती लोप पावू नये म्हणून समाजातील सजग नागरिकांनी वाचन संस्कृती वृद्धिगत होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. एकेकाळी गोपुरी आश्रम कणकवलीच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचा आॅक्सिजन होता. मनुष्याला नैतिकता शिकविणारी आणि संस्कारक्षम बनविणारी गोपुरी सारख्या सामाजिक संस्था टिकल्या पाहिजेत,
मराठी भाषिकांनी इंग्रजी भाषा शिकणे गैर नाही. मात्र, त्यांचा संवादाची भाषा ही मराठी असलीच पाहिजे. ग्लोबल जमान्यात इंग्रजीचे प्रस्थ वाढत असेल तरी मराठी भाषेचा अस्तित्व नष्ट होणार नाही, याची काळजी मराठी माणसांनी घेतली पाहिजे. गोपुरीला लाभलेला वारसा पुढे नेण्याचे काम तरुण मंडळी करीत आहे, ही कौतुकास्पद बाब असून कणकवली शहरात सुरू करण्यात आालेल्या वाचनालयाचा किस्सा सावंत यांनी सांगितला.
दिनेश राणे म्हणाले, महाराष्टÑातील वाचन संस्कृती टिकली पाहिजे. याकरिता ग्रंथालये, वाचनालये काम करीत आहे. ही संस्कृती टिकविण्याचे काम मराठी माणसाने केले पाहिजे. गोपुरी हे सामाजिक परिवर्तनाचे केंद्र असून गोपुरीने माझा केलेला सत्कार घरच्या मंडळींनी केल्यासारखा आहे. नव्या पिढीला वाचन चळवळी जोडून घेण्यासाठी त्यांना डिजिटल स्वरुपात पुस्तके वाचायला दिली पाहिजेत. कारण पुस्तके ही माणसाला नैतिकता आणि संस्कार शिकवते. त्यामुळे नव्या पिढीने मोबाईल, सोशल मीडियाला आपला मित्र बनविण्यापेक्षा पुरस्तकांना आपला मित्र बनवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डी. पी. तानवडे, विलास गुडेकर, अॅड. मनोज रावराणे, सुनील पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहलायच्या मंडळावर दिनेश राणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन विनायक सापळे यांनी केले. आभार राजेंद्र मुंबरकर यांनी मानले. यावेळी गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, सदस्य संदीप सावंत, अर्पिता मुंबरकर, दर्शना पाताडे, पत्रकार तुषार हजारे, आनंद तांबे, नितीन तळेकर, सदाशिव राणे आदी उपस्थित होते.










