बस प्रवासात अडीच लाखांचा कॅमेरा चोरीस ; आरोपीला दिल्लीतून अटक

वैभववाडी (प्रतिनिधी) : दोन महिन्यापूर्वी खाजगी आराम बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा किंमत कॅमेरा चोरणाऱ्या सराईत चोरट्याला वैभवाडी पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. कमलकुमार मुकुंदलाल रेहान वय ४० रा. फरीदाबाद राज्य हरियाणा असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी किरण मारुती राठोड वय 19 रा.कर्नाटक राज्य यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तो मडगाव गोवा ते नांदेड असा खाजगी बसने प्रवास करीत होता.प्रवासादरम्यान त्यांचा सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा कॅमेरा अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. राठोड याचा फोटोग्राफरचा व्यवसाय आहे. तसेच त्याचे स्वतःचे गोर फिल्म नावाचे चॅनल आहे. त्याने 8 डिसेंबर 2025  रोजी सुमारे अडीज लाख रुपये किंमतीचा नवीन कॅमेरा खरेदी केला होता. तो दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी शर्मा ट्रॅव्हल्सने नांदेड येथून गोवा येथे गाण्याच्या शूटिंगसाठी गेला होता. गोवा येथील काम आटपून तो 28 जानेवारी रोजी गोवा येथून शर्मा ट्रॅव्हल्सने नांदेडला जात होता. बस रात्री 8.30 वाजता करूळ विराज हॉटेल येथे थांबली होती. यावेळी राठोड हा खाली उतरून बाथरूमला जाऊन आला. बस येथून सुटल्यानंतर करूळ चेक नाका येथे पोलिसांनी तपासण्यासाठी थांबलवली. त्यावेळी राठोड यांच्या लक्षात आले की त्यांच्या बॅग मध्ये असलेला कॅमेरा गायब आहे.त्याने याबाबत बसच्या ड्रायव्हरला माहिती दिली. यावेळी बसमध्ये असलेला सिसीटीव्ही फुटेज तपासले असता, बस करूळ विराज हॉटेल येथे थांबलेली असतांना एक अनोळखी इसम त्यांच्या बॅग मधून कॅमेरा काढून घेऊन जात असलेला दिसत आहे. गाडीतील सर्व प्रवाशांना खाली उतरून घेऊन चौकशी करण्यात आली. मात्र प्रवाशांमधील कोणीही सीसीटीव्हीत कैद झालेल्या चेहऱ्याचे साम्य असलेला दिसून आलेला नाही. त्यामुळे अखेर राठोड यांनी आपला कॅमेरा चोरीस गेल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली होती.

वैभववाडी पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही च्या आधारे चोरट्याचा शोध घेतला आहे. कमलकुमार हा सराईत चोरटा असून त्याच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे अन्य ठिकाणी नोंद आहेत. ही चोरी करण्यापूर्वी तो दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास करून तिथून कार भाड्याने घेऊन तो गोवा येथे आला होता. गोवा येथे खाजगी आराम बस थांबतात त्या ठिकाणी त्याने प्रवाशांची रेकी केली होती. त्या आधारेच किरण राठोड यांच्याकडे त्यांच्या बॅगमध्ये किमती कॅमेरा असल्याचे चोरट्याने हेरले होते. त्याने त्या बसचा वैभववाडी येथील विराज हॉटेलपर्यंत कारने पाठलाग केला. या हॉटेलवर बस थांबले असता राठोड हे बस मधून खाली उतरले नेमकी हीच संधी साधून चोरट्याने बस मध्ये चढून त्यांच्या बॅगेतील कॅमेरा घेऊन तिथून पोबारा केला होता.

वैभववाडी पोलिसांनी सीसीटीव्ही व अन्य माहितीच्या आधारे दिल्ली येथे जाऊन कमल कुमार याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!