वैभववाडी (प्रतिनिधी) : १७ वर्षीय अल्पवयीन युवतीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे, विनयभंगाचे व्हिडिओ जवळ बाळगून व्हायरल केल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. श्रेयस संजय राणे वय 19 रा. परटवली ता. राजापूर याच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा यात समावेश आहे. लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि त्याचे व्हिडिओ बनवून बदनाम करण्याची धमकी दिल्याप्रकरणी या अगोदरच तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या गुन्ह्यात एकूण सहा आरोपी करण्यात आले आहे.
सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार विनयभंग व त्यांचे व्हिडिओ बनवून बदनामी केल्याची धमकी दिल्यावरून नेर्ले गावातील दोघेजण तर राजापूर ताम्हाणे येथील एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मयुर सुर्वे, ओंकार पंढरी सुर्वे,(दोघेही रा.नेर्ले, ता.वैभववाडी), पंकज पवार(रा. ताम्हाणे बौध्दवाडी,ता.राजापुर )असं संशयित आरोपींची नावं आहेत. त्यांना २० मार्च पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून श्रेयस राणे याच्यासह अन्य दोन अल्पवयीन मुलांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर अश्लील व्हिडिओ जवळ बाळगून व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेयस राणे याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर अल्पवयीन दोन मुलांना समज देऊन सोडण्यात आले आहे.










