आंब्याच्या झाडाची फांदी कोसळून मजुराचा मृत्यू; पडवे शिर्केवाडीत दुर्दैवी घटना

ओरोस (प्रतिनिधी) : यशवंत वामन वायंगणकर (४१, रा. रानबांबुळी वायंगणकरवाडी) यांचा आंब्याच्या झाडाची फांदी अंगावर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवार २० मार्च रोजी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना पडवे शिर्केवाडी येथे घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडलेले यशवंत हे त्या दिवशी मजुरीच्या कामासाठी गेले होते. आंब्याचे झाड तोडण्याचे काम सुरू असताना त्यांनी फांदी दोरीच्या सहाय्याने खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. अचानक मोठी फांदी त्यांच्या अंगावर कोसळली आणि क्षणात सगळे काही बदलून गेले.

त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने वायंगणकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

याबाबतची फिर्याद त्यांचे चुलत भाऊ गजानन घनश्याम वायंगणकर (५४) यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मजुरीसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

error: Content is protected !!