कणकवली (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद ह्या साहित्य क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेच्या वर्धापन दिनी संस्थेतर्फे संस्थेच्या वाटचालीत मराठी भाषा, मराठी साहित्य व साहित्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचे सत्कार सन्मान कोमसापच्या येत्या वर्धापन दिनी २४ मार्च २०२६ रोजी कवी केशवसुत स्मारक, मालगुंड, रत्नागिरी येथे सुप्रसिध्द साहित्यिक व कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत.
त्यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांनी कोमसाप संस्थेसाठी संस्था स्थापनेपासून केलेल्या योगदानासाठी त्यांचा सन्मान केला जाणार आहे. डॉ. सुनील सावंत कोमसाप संस्थेचे सन १९९० पासून स्थापना सदस्य आहेत. ते कोमसाप दादर शाखेचे माजी अध्यक्ष होते. ते कोमसाप मुंबई जिल्हा मंडळाचे माजी जिल्हा समन्वयक होते, संस्थेच्या झपूर्झा मुखपत्राचे माजी व्यवस्थापकीय संपादक होते, कोमसाप मुंबई जिल्हा मंडळाचे कार्यवाह होते आणि संस्थेच्या अनेक साहित्य संमेलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ह्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान इतर काही सन्माननीय व्यक्तिमत्वांसोबत होणार आहे.
ते कोकणातील भिरवंडे गावचे सुपुत्र असून कोकणातील एक सुप्रसिध्द साहित्यिक आहेत. त्यांची मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत एकूण २१ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या पाच काव्यसंग्रहातील कवितावरील समीक्षा ग्रंथ डॉ. सुनील सावंत कवी आणि कविता हे पुस्तक ‘अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस’ ह्या वॉशिंग्टन येथील वाचनालयात संदर्भ ग्रंथ म्हणून सन २००७ सालात निवडले आहे. हा मराठी भाषेचा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
डॉ. सुनील सावंत हे वंदना प्रकाशन मुंबई ह्या संस्थेचे संस्थापक असून मागील २७ वर्षे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीकरिता मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील छापील पुस्तकांना आशीर्वाद पुरस्कार प्रदान करतात. ह्या कोमसाप संस्थेतील कार्याबद्दल मिळणाऱ्या सन्मानाबद्दल साहित्य क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.










