सरपंचांच्या मनमानी कारभाराचा ग्रामस्थांकडून विरोध
दोडामार्ग (प्रतिनिधी) : मोरगाव येथील दलित वस्तीत बसविण्यात येणाऱ्या सौर पथदिव्यांच्या कामावरून ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्यात वाद निर्माण झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार मंजूर असलेले पथदिवे दलित वस्तीत न बसवता इतर वस्तीमध्ये काम सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना तसेच जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून मोरगाव दलित वस्तीसाठी १५ सौर पथदिव्यांना मंजुरी देण्यात आली होती. या योजनेसाठी ५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता असून १ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र, सरपंच संतोष आईर यांनी कंत्राटदाराला दलित वस्ती वगळून गावठाण व बागवाडी येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत खड्डे खोदण्याचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत वस्तीतील लोकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सिमेंट फाउंडेशन टाकण्यात आले. ग्रामस्थांनी शासन निर्णयाची प्रत पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तसेच पथदिव्यांची सामग्री सरपंचांनी स्वतःच्या घरी ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकाराला विरोध करत ग्रामस्थांनी काम थांबवले. त्यानंतर ग्रामसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला असता गटविकास अधिकारी यांच्याकडून चौकशी केली जाईल, असे आश्वासन सरपंचांनी दिले होते. काही दिवसांनी दलित वस्तीत खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले; मात्र दोन महिने उलटूनही पुढील काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, सरपंचांकडे पुन्हा विचारणा केल्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून, या प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात ग्रामस्थ गटविकास अधिकारी, दोडामार्ग यांच्याकडे सोमवार 23 मार्च रोजी लेखी तक्रार दाखल करणार आहेत.










