फोंडाघाटमध्ये शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते उद्घाटन व बक्षिस वितरण

फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन (महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने), गणेश तरुण मंडळ फोंडाघाट आणि सरवंजे फिटनेस सेंटर फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन तसेच बक्षिस वितरण शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख संदेश पटेल उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय आग्रे म्हणाले की, आजच्या तरुणांनी क्रीडा व शरीरसौष्ठव क्षेत्राकडे वळणे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. नियमित व्यायाम, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर निरोगी शरीरासोबतच सक्षम व्यक्तिमत्त्व घडते. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे तरुणांना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळते. आयोजकांनी घेतलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून भविष्यातही अशा उपक्रमांना आपले संपूर्ण सहकार्य राहील.यानंतर मनोगत व्यक्त करताना संदेश पटेल म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत तरुणांनी व्यायामाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. निरोगी शरीर हेच खरे धन असून नियमित व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या मेहनतीचे आणि शरीरसौष्ठवाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या स्पर्धेसाठी बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील मान्यवर पंच (न्यायाधीश) उपस्थित होते. त्यांनी स्पर्धकांच्या शरीरयष्टी, सादरीकरण व फिटनेसच्या आधारे निकाल जाहीर केला.

या यशस्वी स्पर्धेसाठी आयोजकांचे अभिनंदन करत सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास आयोजक, क्रीडाप्रेमी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!