चिंदर वाचनालयाच्या वतीने गावातील बिडीएस व एसटीएस मेडल प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
आचरा (प्रतिनिधी) : श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदरच्या वतीने चिंदर गावातील गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा, सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च, ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मेडल प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक २२ मार्च रोजी संपन्न झाला. यामध्ये गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात व्दितीय क्रमांक प्राप्त तनुश धोंडी चिंदरकर, सिंधु रत्न टॅलेंट सर्च परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त कौस्तुभ निलेश पावसकर, सिंधुरत्न टॅलेंट सर्च मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त मंदार मंगेश वरक, सर्वेश महेश कदम, वैखरी मकरंद केळकर तसेच सिंधुरत्न टॅलेंट सर्च मध्ये ब्राँझ मेडल प्राप्त बापू गणेश जंगले, आर्यन संतोष वरक, तस्विरी प्रसाद चिंदरकर, सुजन परेश चव्हाण, केतकी प्रमोद गांवकर, चैताली शंकर अपराज, इशिता शिशिर पालकर या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला…
यावेळी नुतन आचरा जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी तसेच चिंदर पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे म्हणाले की, चिंदर गावात माझा पहिला सत्कार होत आहे त्यामुळे मी भारावून गेलो असून वाचनालयाला कोणतेही सहकार्य लागल्यास आपण कटिबद्ध आहोत.
मुलांच्या कौतुक सोहळ्यात पालकांची उपस्थिती हि प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल असून विद्यार्थ्यांना रामरक्षा, मनाचे श्लोक तसेच दर्जेदार पुस्तके वाचण्याच्यासाठी द्यावीत. वाचनालयाशी सल्लग्न रहा. आपले भविष्य उज्ज्वल राहील तसेच गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत येवढं मोठ यश मिळवणं सोपी गोष्ट नाही असे गौरवोद्गार जि. प. सदस्य सौ. वर्षा सांबारी यांनी काढले.
अध्यक्षीय भाषणात प्रकाश मेस्त्री म्हणाले की, चिंदर गावातील माझ्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचा आत्मविश्वास वाढावा हाच आमचा असे कार्यक्रम करण्याचा मागचा प्रामाणिक हेतू असतो. मुलांच्या पाठीवर शाबासकीची, कौतुकाची थाप मिळाल्यानंतर खरोखरच मुलांचा आत्मविश्वास व्दिगुणित होतों. बिडीएस व एसटीएस परिक्षेत मेडल प्राप्त करण हि कौतुकाची बाब असून गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात व्दितीय आलेल्या तनुश चिंदरकरचे यश गावांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
यावेळी ग्रंथालय उपाध्यक्ष संतोष पाताडे, खजिनदार देवेंद्र हडकर, कार्यवाह हेमांगी खोत, ग्रंथपाल स्वरा पालकर, हिमाली अमरे, गोपाळ चिंदरकर, रावजी तावडे, विकास पाताडे, अशोक पाताडे, संतोष अपराज, सागर अपराज, चिन्मयी पाताडे, धनश्री भावे, मंगेश वरक, बाबू जंगले, रणजित दत्तदास, विभावरी चव्हाण, निशिगंधा वझे, भालचंद्र गोलतकर, विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन कार्यवाह हेमांगी खोत यांनी केले. तर आभार सिध्देश गोलतकर यांनी मानले.












