वसुंधरा 5.0 अभियानात राज्यस्तरीय यशामध्ये सौंदळे ग्रामपंचायतची झेप

25 लाखांचा पुरस्कार पटकावून सौंदाळे ग्रामपंचायतीने घेतली उंच भरारी

देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मार्फत 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या “माझी वसुंधरा अभियान 5.0” अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौंदाळे ग्रामपंचायतीला तब्बल 25 लाख रुपयांचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशामुळे परिसरात ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत असून इतर गावांसाठीही सौंदाळे आदर्श ठरत आहे.

या अभियानामध्ये पंचमहाभूतांवर आधारित –
भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा) आणि आकाश (संवर्धन) या घटकांवर प्रत्यक्ष काम करून पर्यावरण संवर्धन व संरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विविध उपक्रम राबवून शाश्वत विकासाची दिशा गावाने प्रत्यक्षात दाखवून दिली. या यशामध्ये सरपंच मनाली सूर्यकांत कामतेकर, उपसरपंच विष्णू परशुराम राणे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी सुशिल जाधव यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

पंचायत समिती देवगडचे तत्कालीन गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण तसेच विस्तार अधिकारी निलेश जगताप व अंकुश जंगले यांचे मार्गदर्शनही लाभले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातही शाश्वत विकास साधता येतो याचे उत्तम उदाहरण सौंदाळे ग्रामपंचायतीने निर्माण केले आहे. परिसरातून ग्रामपंचायतीचे अभिनंदन होत असून, पुढील काळातही अशाच उपक्रमांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!