देवगड (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, देवगड मंडलाच्या वतीने ५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांर्गत सकाळी १० वाजता इको व्हिलर ग्रुपच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ यांनी जामसंडे येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, नगरसेविका ॲड. प्रणाली माने, भाजयुमोचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले, तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, योगेश पाटकर, सर्फराज शेख, इको व्हिलर ग्रुपचे सुरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. उपक्रमाची माहिती देताना सुरेंद्र चव्हाण म्हणाले, ही सायकल रॅली सकाळी १० वा. भाजप कार्यालय येथून सुरू होणार आहे. खुल्या गटासाठी २५ किमीचे अंतर, तर १२ वर्षाखालील लहान गटासाठी ११ किमीचे अंतर ठेवण्यात आले आहे. खुल्या गटासाठी भाजप कार्यालय ते कातवण (पेट्रोल पंप) व तेथून पुन्हा भाजप कार्यालय, तर लहान गटासाठी भाजप कार्यालय ते कुणकेश्वर व तेथून पुन्हा भाजप कार्यालय या मार्गावर ही सायकल रॅली होणार आहे. रॅलीत सहभागी सायकलपडूंना हॅल्मेट बंधनकारक असणार आहे. तसेच सर्व सायकलपटूंना मोफत टी-शर्ट, मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या उपक्रमात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष राजा भुजबळ यांनी केले आहे.











