डॉ. बालाजी सुरवसे यांना ‘चीफ एज्युकेशन आयकॉन पुरस्कार – 2026’ प्रदान

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मुंबईत सन्मान

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल छत्रपती हायर एज्युकेशन इंटेलेक्च्युअल फोरम (CHIEF) यांच्या वतीने दादर, मुंबई येथील शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात ब्रिगेडियर सुधीर सावंत (माजी खासदार) यांच्या हस्ते तसेच छत्रपती उच्च शिक्षण बौद्धिक मंचचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ डॉ. सुरवसे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांची महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून कोकण बोर्डचे सदस्य म्हणून दोन वेळा निवड करण्यात आली होती. तसेच ते मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे दोन वेळा निवडून आलेले सदस्य असून अर्थशास्त्र विषयाच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अनेक सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

संशोधन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून ते मुंबई विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पीएच. डी. मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी प्राप्त झाली असून सध्या पाच विद्यार्थी संशोधन कार्य करत आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले असून एका विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्य स्तरावर सुवर्णपदक मिळवले आहे.

डॉ. सुरवसे यांनी अर्थशास्त्र विषयावर ५० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये १०० पेक्षा अधिक संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत. तसेच भारत सरकारच्या सातव्या आर्थिक जनगणना (Economic Census 2019) साठी सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील समन्वय समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी (MPSC) अर्थशास्त्र विषयाचे प्रश्नपत्रिका तयार करणारे तज्ज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याशिवाय त्यांनी मुंबई विद्यापीठ तसेच महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध समित्यांवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

या पुरस्काराबद्दल आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रम काळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीषा कर्णे, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. सुरेश मैद, यशवंतराव रिसर्च सेंटरचे डायरेक्टर योगेश कुदळे तसेच फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार विठोबा तायशेटे, संस्थेचे संचालक, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्राचार्य डॉ. पुरंधर नारे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. सुरवसे म्हणाले की, हा सन्मान केवळ माझा नसून फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील सहकारी, विद्यार्थी, मुंबई विद्यापीठातील अधिकारी, विविध क्षेत्रातील मित्रपरिवार तसेच कुटुंबीय यांच्या सातत्यपूर्ण सहकार्य, प्रेरणा व आशीर्वाद यांचे फलित आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अधिक समर्पण भावनेने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

error: Content is protected !!