खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. कळसुली सुद्रिकवाडी येथील इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी हर्षिता नंदकिशोर सुद्रीक ही कर्णदोषामुळे आजारी असून, तिच्या पुढील शस्त्रक्रियेसाठी संघटनेच्या वतीने १०,००० रुपयांचा आर्थिक मदतीचा चेक नुकताच तिच्याकडे सुपूर्द करण्यात आला. संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
हर्षिताला असलेल्या या कर्णदोषामुळे तिच्यावर पुढील उपचार आणि ऑपरेशन करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षक समितीने तिला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. मदतीचा हा धनादेश सुपूर्द करताना तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज, शिक्षक नेते टोनी म्हापसेकर, जिल्हा उपाध्यक्ष धीरज हुंबे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर, शिक्षक पतपेढी संचालक श्रीकृष्ण कांबळी, ऋतुजा जंगले, जिल्हा उपाध्यक्ष अजय तांबे, तालुका सचिव निलेश ठाकूर, जिल्हा विभागीय अध्यक्ष किशोर गोसावी आणि जिल्हा संघटक संतोष राणे यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनीला धीर दिला.
तसेच तालुका हिशेब तपासणीस नंदकुमार सरंगले, कनेडी विभागीय उपाध्यक्ष जगन्नाथ घाडीगांवकर, माजी तालुका कार्याध्यक्ष प्रशांत दळवी आदी संघटना पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. “केवळ शिक्षकांचे प्रश्नच नव्हे, तर समाजातील गरजू घटकांसाठी धावून जाणे हे संघटनेचे कर्तव्य आहे,” अशी भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.












