सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटर” मैदान उद्घाटन सोहळा

पुणे (प्रतिनिधी) :  कन्नड संघ पुणे येथील नव्याने विकसित क्रीडा मैदानाचा उद्घाटन व नामकरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. हा सोहळा संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा एक ऐतिहासिक क्षण ठरला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  मीरा सुरेश कलमाडी उपस्थित होत्या. तसेच कुशल हेगडे (अध्यक्ष, कन्नड संघ पुणे), मालती एस. कलमाडी (सचिव, कन्नड संघ पुणे), विश्वस्त पायल कलमाडी भारतीय, आणि आदित्य भारतीय (व्यवस्थापकीय संचालक, अॅडविक हाय-टेक प्रा. लि.) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी मैदानाचे नामकरण “सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटर” असे करण्यात आले. दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. अॅडविक फाउंडेशनच्या सहकार्याने साकारलेल्या या प्रकल्पातून आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्याचा संकल्प दिसून येतो.

२५ डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये मैदानाचे वैज्ञानिक पद्धतीने पुनर्बांधणी, पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्था विकसित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार दोन बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले असून त्यावर अँटी-स्किड सिंथेटिक पृष्ठभाग देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण मैदानात झिरो-शॅडो लायटिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

कार्यक्रमात स्वागत, प्रकल्पाची माहिती डॉ. मुक्ता करमरकर (प्राचार्य, कावेरी कॉलेज) यांनी सादर केली. मान्यवरांचा सत्कार, पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनतर्फे कोर्ट प्रमाणपत्र प्रदान, तसेच व्यवस्थापन, अॅडविक प्रतिनिधी व प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शक भाषणे झाली.

अलॅक्रिटी जिम्नॅस्टिक अकॅडमीच्या प्रात्यक्षिकांनी आणि बास्केटबॉल प्रदर्शन सामन्याने कार्यक्रमात उत्साह वाढवला. कार्यक्रमाचा समारोप सुमती श्रीनिवासन यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

नवीन विकसित क्रीडांगण हे भविष्यात खेळाडू घडविण्यासाठी प्रेरणादायी केंद्र ठरणार असून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा विकासाला चालना देईल.

error: Content is protected !!