ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीत ऐतिहासिक टप्पा गाठत एकूण व्यवसाय तब्बल ७ हजार कोटींच्या पुढे नेला आहे. गेल्या काही वर्षांतील नियोजनबद्ध वाटचाल, पारदर्शक कारभार आणि ग्राहकाभिमुख धोरणांमुळे बँकेने ही उल्लेखनीय भरारी घेतली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री दळवी बोलत होते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवाकर देसाई, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक रविंद्र मडगावकर, समीर सावंत यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना दळवी यांनी, ३१ डिसेंबर २०२१ रोजी ४२७७.६६ कोटींवर असलेला बँकेचा एकूण व्यवसाय वाढून वर्षअखेर ७१७६.२१ कोटींवर पोहोचला आहे. ठेवी २२६३.३० कोटींवरून ३९४२.५७ कोटींपर्यंत वाढल्या आहेत. कर्ज वितरणही २०१४.३६ कोटींवरून ३२३३.६४ कोटींपर्यंत पोहोचले आहे. निव्वळ नफ्यातही मोठी झेप घेत ३५ कोटींवरून तो थेट ५० कोटींवर गेला आहे. गेल्या चार वर्षांत सर्वच आर्थिक निर्देशांकात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाल्याने बँकेची आर्थिक ताकद अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या ४२ वर्षांपासून जिल्ह्याच्या आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या बँकेने ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत डिजिटल बँकिंग सेवांमध्येही बँकेने लक्षणीय प्रगती केली आहे.
१३ जानेवारी २०२२ रोजी नव्या संचालक मंडळाने पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष म्हणून माझ्या नेतृत्वाखाली बँकेने प्रगतीचा वेग अधिक वाढवला आहे. सुदृढ धोरणे, योग्य नियोजन आणि पारदर्शक व्यवहार यामुळे बँकेला सातत्याने “अ” दर्जा मिळत आहे.
शेतकरी, युवक, महिला, कारागीर आणि नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच शिक्षणासाठी सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १८ शाखा आणि ४१ एटीएम केंद्रांच्या माध्यमातून आधुनिक सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी ‘बँक सखी’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून गावपातळीवरच महिलांना बँकिंग सेवा उपलब्ध होत आहे. तसेच प्राथमिक विकास सेवा संस्थांच्या बळकटीकरणासाठी व संगणकीकरणासाठी विविध प्रोत्साहन योजना राबविण्यात आल्या आहेत. या उपक्रमांमुळे संगणकीकरण प्रकल्पात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. एकूणच वाढता ग्राहक विश्वास, पारदर्शक सेवा आणि सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे बँकेने आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया उभारला आहे, अध्यक्ष दळवी यांनी सांगितले.
दोन वर्षात दहा हजार कोटींचा टप्पा
या यशाचे श्रेय देताना बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक, संचालक मंडळ तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान अधोरेखित करत भविष्यातही ही प्रगती अशीच गतीमान ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच पुढील वर्षी साडेआठ कोटींचा टप्पा तर पुढील दोन आर्थिक वर्षात दहा हजार कोटींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले.












