वैभववाडीत अवकाळी पावसाचा तडाखा

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे, करूळ, भुईबावडा परिसरात गुरुवारी सायंकाळी अचानक जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र या अवकाळी पावसाचा फटका फळबागांना बसला असून विशेषतः आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंब्याची फळे मोठ्या प्रमाणात झाडावरून खाली पडून गळती झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला होता. त्यानंतर गुरुवारी सह्याद्री पट्ट्यातील अनेक गावांमध्ये वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला.या अनपेक्षित पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून नुकसानग्रस्त भागांचा तातडीने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!