- ज्ञानेश्वर रावराणे (जेष्ठ पत्रकार)
वैभववाडी तालुक्यातील तळेरे – गगनबावडा हायवेवर असलेले माझे गाव एडगाव. एक आदर्श गाव. याच लाल मातीत जन्मलेला, कष्टाने शून्यातून विश्व निर्माण करणारा सिंधुदुर्गातील भाजपचा एक धडाडीचा तरुण नेता म्हणजे प्रमोद रावराणे. एडगावातील दिवंगत माजी सरपंच नानांचा हा धाकटा चिरंजीव आणि माझा शेजारी असलेला हा भाऊ. आज वयाची ५० वर्षे पूर्ण करत आहे. एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्याचा प्रवास आज जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात एक भक्कम आधारस्तंभ बनला आहे. गावचा निसर्ग आणि गावाने दिलेली कर्तृत्ववान माणसे पाहिल्यावर या प्रवासावर लिहिणे एक कर्तव्य समजतो. गावची प्रेमळ माणसे, गावचा निसर्ग, सारा देखावा फेर धरून सभोवती उभा राहत असतो आणि माझ्यावर लिही म्हणून सांगत असतो.
आमच्या एडगावच्या हजार-बाराशे लोकवस्तीच्या गावाने नेहमीच उच्च आदर्शाचा ध्यास बाळगला आहे. साधारण पन्नास-साठ वर्षांपूर्वी अर्जुनरावांनी वाभव्यात एक विद्यालय सुरू केले आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनाचे अक्षरशः सोने झाले. अनेक गावात, मुंबईत कर्तृत्ववान लोक घडली आणि आज अनेक जण उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यातीलच एक अभिमानास्पद नाव म्हणजे प्रमोदराव.
प्रमोदची कौटुंबिक पार्श्वभूमी खूपच सामान्य होती. त्याने गरिबीला कधीही स्वतःची कमजोरी बनू दिले नाही. उलट, तीच त्याच्या जगण्याची आणि पुढे जाण्याची मोठी ताकद बनली. बालपणापासून त्याचे वडील नानांकडून राजकारण आणि समाजकारणाचे धडे मिळाले. ‘कष्ट करण्याची जिद्द असली की नियतीलाही झुकावे लागते’, हे त्याने आपल्या अढळ विश्वासातून आणि कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले. परिस्थितीचे चटके सोसत त्याने स्वतःचा मार्ग स्वतःच प्रशस्त केला.
दूरदृष्टीने पालटलेय एडगावचे रूप
प्रमोदचं गावावर त्याचे प्रचंड प्रेम आणि तळमळ. त्याने गावात खऱ्या अर्थाने विकासाची कामे केली. ज्या ठिकाणी पूर्वी गुरे-ढोरेही जाऊ शकत नव्हती, तिथे त्याने पक्के डांबरी शेत रस्ते नेले. यामुळे परिसरात काजूच्या फळबागा फुलल्या. सोबत बांबू शेती फोफावली. त्यामुळे ग्रामस्थांच्या जमिनींना चांगला भाव आला. पावसाळ्यात जुन्या पुलांवरून कमरेपेक्षा उंच पाणी जायचे, ही अडचण ओळखून त्याने गावात उंच आणि रुंद पूल बांधले. काही ठिकाणी नवी पूल बांधले.
पूर्वी लाल रंगाच्या कच्च्या पायवाटांच्या जागी छोट्या-मोठ्या पक्क्या पाणंदी उभ्या राहिल्या. प्रमोदने माझ्याच गावात रस्ते बांधले नाहीत तर आजूबाजूच्या गावातही विकासाची कामे केली. आपल्ली ओळख आणि संपर्कातून शासनाचा कोट्यवधी निधी गावात आणून त्याने पूर्वीच्या ओबडधोबड दिसणाऱ्या गावाचे रूप पालटण्याचा प्रयत्न केला. तालुका पातळीवर वैद्यकीय तसेच अनेक सामाजिक मेळावे आयोजित केले. त्याचा लाभ गोरगरीब लोकांना झाला.
प्रमोदची अभ्यासू वृत्ती
अनेक भावबंधांना मी नेहमी सांगत असतो की, ‘रावांनी आता तलवार घेऊन चालण्यापेक्षा बुद्धीने चालावे, तरच प्रगतीचा मार्ग खुला होतो.’ प्रमोद हा याच विचारसरणीचा एक अभ्यासू आणि विचारवंत माणूस आहे आणि म्हणूनच आज त्याची छाप उठून दिसते. मागे एकदा एडगावातील हायवे रुंदीकरणाच्या समस्येबाबत तहसीलदार कार्यालयात हायवे अथॉरिटी आणि प्रांत अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी अभ्यासू प्रमोदने अधिकाऱ्यांसमोर असे काही सडेतोड प्रश्न उपस्थित केले की ते अधिकारी पुरते गडबडले. त्यांना उत्तरे देता आली नाहीत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ही त्याच्या अभ्यासू आणि तडफदार नेतृत्वाची एक छोटीशी चुणूक आहे. मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो.
धावून जाणारा परोपकारी माणूस
प्रमोदचा स्वभाव मी अगदी अनुभवला आहे. तो वेळप्रसंगी धावून जाणारा एक अत्यंत परोपकारी माणूस आहे. गावात कोणालाही अचानक वैद्यकीय मदतीची गरज भासली, तर तो स्वतःची गाडी बाहेर काढतो आणि रुग्णाला थेट कोल्हापूरपर्यंत नेऊन त्याच्यावर उपचार होईपर्यंत सोबत थांबतो. त्याच्या मनात कोणाबद्दलही कधी आकस नसतो. एवढी मोठी पदे भूषवूनही ‘साहेब आले, आता जाऊन खुर्चीवर बसूया’ असा अहंकार त्याच्यात अजिबात नाही. तो कोणत्याही सामाजिक कार्यात नेहमी हिरिरीने पुढे असतो. गावातील कोणत्याही कार्यक्रमात किंवा पंगतीत स्वतः हातात भांडे घेऊन आग्रहाने जेवण वाढताना प्रमोद दिसतो, तेव्हा त्याच्यातील साधेपणाची आणि लोकांप्रती असलेल्या जिव्हाळ्याची खरी ओळख पटते.
लोकांच्या विश्वासातून मिळाली अनेक पदे
प्रमोद आज महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचा संचालक, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जि. प. सदस्य, भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष आणि वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचा चेअरमन आहे. ही सर्व पदे केवळ राजकीय नाहीत, तर ती लोकांच्या त्याच्यावरील अढळ विश्वासाची पावती आहे. सहकार क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या राजकारणात त्याने तळागाळातील जनतेशी, शेतकऱ्यांशी नाळ जोडून आपले भक्कम स्थान निर्माण करीत आहे. लोकांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळेच तो इथपर्यंत मजल मारू शकला.
एका प्रेरणादायी प्रवासाचा सन्मान
प्रमोदरावांचा या यशस्वी प्रवासाचा सार्थ अभिमान वाटतो. आज शुक्रवार संध्याकाळी एडगाव ग्रामपंचायतीच्या मैदानावर त्याचा 50 वा वाढदिवस साजरा होत आहे. हा सोहळा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नसून, तो एका संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा सन्मान आहे. प्रमोद आता तिथवली परिसराचं नेतृत्व करीत आहे. तो परिसर हा दुर्गम, अविकसित आणि कष्टकरी लोकांचा आहे. त्या गावातही माझ्या गावासारखे काम करेल, असा मला ठाम विश्वास आहे.
प्रमोदला या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
– ज्ञानेश्वर रावराणे (जेष्ठ पत्रकार)












