कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई )आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणाल नारकर, सोनिया ढेकणे यांनी यश मिळवले आहे. तर राज्य पंच परीक्षेत तनिष्का सावंत व श्रीनिधी सावंत यांनी यश मिळवले.ही परीक्षा रत्नागिरी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे घेण्यात आली होती.
या परीक्षेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.ही परीक्षा तायक्वांदो खेळातील तांत्रिक कौशल्य, शारीरिक क्षमता आणि आत्मसंरक्षणाच्या विविध अंगांचा कस लावणारी असल्याने ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
यासाठी त्यांना मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अँड फिटनेस अकॅडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदेश पारकर तसेच पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी,सुधीर राणे, विनायक सापळे,अमित जोशी यांनी अभिनंदन केले आहे.












