स्थापना दिनानिमित्त विशाल परब यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
बांदा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. तसेच भारतमाता, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला. भाजपच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेताना अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अभिमान आणि प्रेरणेची भावना दिसून आली.
या प्रसंगी बोलताना विशाल परब यांनी भावनिक शब्दांत पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, “भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो विचारांची, त्यागाची आणि देशसेवेची एक सशक्त चळवळ आहे. सामान्य कार्यकर्त्याच्या कष्टावर उभा असलेला हा पक्ष आज देशाच्या विकासाचा आधारस्तंभ बनला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने निस्वार्थ भावनेने समाजासाठी काम करत राहणे हीच खरी पक्षसेवा आहे.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या नव्या उंची गाठल्या असून, या विचारधारेचा प्रसार गावागावात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.”
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकदिलाने पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा व्यक्त करत पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज नाईक, उपसभापती गौरव मुळीक, मा. नगरसेवक राजू बेग, युवा मोर्चा शहराध्यक्ष हितेन नाईक, नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, शिरीष नाईक, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, साईनाथ जामदार शक्ती केंद्र प्रमुख, उपाध्यक्ष सुमित वाडकर, संतोष गावस, समीर कुडाळकर, विजय रेडकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. तर या उत्साहवर्धक सोहळ्यामुळे सावंतवाडीत भाजपा स्थापना दिनाचा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला.












