सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर आनंदी जीवन जगण्यासाठी दिले जाणारे जीवन वेतन निधी सातत्याने अनियमित दिले जाते. त्यासाठी राज्य कोषागार कार्यालया कडील नियम २०१८ चे मार्गदर्शन विचारात घेतले जात नाही. ज्येष्ठ नागरिक सनद मधील मार्गदर्शक सूचनांचे वाचनच केले जात नाही. याबाबत सेवानिवृत्त वयोवृद्ध, विकलांग, विविध व्याधीग्रस्त प्राथमिक शिक्षक एकाकीपणा जीवन जगत आहेत. याबाबत केवळ निवृत्ती वेतनधारकांसाठी आयोजित पेन्शन अदालती मध्ये चर्चा होते, मात्र कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. या भूमिकेमुळे प्रशासनाबाबत सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तरी याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका ठेवत सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत. अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षकांकडून केली जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषद भवनासमोर सेवानिवृत्त शिक्षकांनी शेकडोच्या संख्येने उपस्थिती दर्शवत धरणे आंदोलन केले तर याबाबत दखल न घेतल्यास १३ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन केले जाईल.तर प्रसंगी अध्यक्ष म्हणून आपण बेमुदत उपोषणास प्रारंभ करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सावळारामआणावकर यानी इशारा दिला आहे.
या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले
वरिष्ठ वेतनश्रेणी १९६७ ते १९८६ पर्यंतच्या १२८३ शिक्षकांच्या यादीपैकी ५२२,(२० टक्के) शिक्षकांना प्राप्त झाली आहे . उर्वरित १९८७ ते आजपर्यंत पात्र शिक्षकांची सूची अद्याप तयारच करण्यात आलेली नाही .,
जिल्हा परिषद पुरस्कार जिल्हा परिषद फंडातून दिला जातो, त्याप्रमाणे वेतन वाढीचे वेतन निश्चित नाही.,
बढतीचे तसेच उत्कृष्ट कामाची वेतन वाढ तीन-तीन वर्षे पूर्तता नाही .,
सेवानिवृत्तीची चार ते पाच वर्षे संपली तरी गट विमा मिळत नाही.,
माहिती अधिकार २००५ चा वापर करून मागितलेली माहिती तालुकास्तरावरून दिली जात नाही.
या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हा परिषद प्रशासनामध्ये उदासीनता, निष्क्रियता दिसून येत आहे. तरी संबंधित यंत्रणेला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली जावी. अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनास दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या सर्व प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषदेसमोर शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.












